शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुळ्या बहिणींशी लग्न केलेल्या अतुलला मोठा दिलासा; न्यायालयानं पोलिसांना कायदाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:59 PM

1 / 10
मागील आठवड्यात जुळ्या बहिणींनी एकाच युवकाशी लग्न केल्याची मोठी चर्चा झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या अतुल आवताडे या तरुणाने एकाच मांडवात दोन सख्या जुळ्या बहिणींसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
2 / 10
अतुल आणि रिंकी-पिंकी यांच्या विवाहाचे फोटो पाहून अनेकांनी त्यावर मिम्स बनवले. केवळ राज्यातच नाही तर देशातील सर्व माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. त्यानंतर एकाचवेळी २ मुलींशी लग्न केल्याप्रकरणी नवरदेव अतुल चांगलाच अडचणीत आला.
3 / 10
अकलूज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कोर्टासमोर हे प्रकरण नेले. मात्र आता सोलापूर न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे अतुलला मोठा दिलासा मिळाला आहे.
4 / 10
या प्रकारात अतुलची चौकशी करण्यास कोर्टाने परवानगी नाकारली आहे. जुळ्या बहिणींशी लग्न केल्यामुळे अतुलवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाचे अधिकार मिळवण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो. परंतु कलम १९८ चा हवाला देऊन न्यायाधीशांनी या खटल्याची चौकशी नाकारली असं पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे म्हणाले.
5 / 10
या प्रकरणात तक्रारदार म्हणजे पीडित पक्ष म्हणजे संबंधित कुटुंबातील सदस्य असावा. मात्र तक्रारदार हा तिसरा व्यक्ती आहे त्यामुळे याचिकेची दखल घेऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात आता नवरदेव अतुलवर कुठलीही कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे.
6 / 10
मुंबई येथे राहणाऱ्या जुळ्या बहिणींना लहानपणापासून एकत्र राहण्याची सवयच लागल्यामुळे दोघांनीही आयुष्याचा साथीदार हा एकच निवडला. त्यांनी अतुल आवताडे या युवकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेत सोलापूरच्या अकलूज येथे विवाह पार पडला.
7 / 10
मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या आणि जुळ्या बहिणींच्या आनंदावर विरजण पडले. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केल्यानं पोलिसांनी नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल केला.
8 / 10
भारतीय दंड विधान ४९४ नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही. असं केल्यास ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. हिंदू विवाह कायद्यानुसार एका पुरुषाने २ लग्न करणे कायद्याने गुन्हा ठरतो. या कायद्याचा आधार घेत अतुलवर गुन्हा दाखल झाला.
9 / 10
परंतु ४९४ कलमांतर्गत फक्त पती आणि पत्नीलाचं तक्रार करण्याचा अधिकार आहे. लग्न पूर्णपणे दोन व्यक्तीपुरता मर्यादित विषय असल्याने त्रयस्त व्यक्तीला यामध्ये तक्रार करण्याचा अधिकार कायद्याने दिला नाही.
10 / 10
त्यात राहुल फुले हा त्रयस्थ व्यक्ती असल्याने त्याची तक्रार वैध नाही. अतुलने केलेल्या लग्नाबाबत त्याच्या २ पत्नींची कुठलीही तक्रार नाही. त्यामुळे हा कायदेशीर पेच असल्याने अतुलवर कारवाई होऊ शकत नाही हे न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले.
टॅग्स :marriageलग्न