शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'A से अमेठी, B से बारामती'; सरकार ठाकरेंचं गेलं, पण खरा धक्का सुप्रिया सुळेंना बसलाय, कसा ते जाणनू घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 8:57 PM

1 / 11
राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टानं सुनावणी १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. ठाकरे सरकार कोसळून सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसला. पक्षात उभी फूट पडली. पण व्यवस्थित गणितं जुळवून पाहिलं तर मोठा फटका शरद पवारांच्या मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना बसला आहे.
2 / 11
सध्याच्या परिस्थितीनुसार राजकीय समीकरणं पाहिलं तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी चिंता वाढवणारे मुद्दे समोर आले आहेत. कारण बारामतीत पवारांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.
3 / 11
सुप्रिया सुळे लोकसभेत बारामती मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतात. याठिकाणी एकूण ६ जागा विधानसभेच्या जागा आहेत. बारामती सिटी, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर विधानसभा मतदार संघ मिळून बारामतीचा लोकसभा मतदार संघ तयार होतो.
4 / 11
२०१४ साली सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत ५० हजारांच्या फरकानं विजय प्राप्त केला होता. तर २०१९ मध्ये तब्बल १ लाख मतांच्या फरकानं सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय साजरा केला होता. २०१९ मध्ये सुळे यांची लढत भाजपाच्या कांचन कुल यांच्याशी होती.
5 / 11
बारामती सिटीमधून सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं. यानंतर इंदापूर, भोर आणि पुरंदर भागातूनही सुळे यांना मोठं मताधिक्य प्राप्त झालं होतं. पण दौंड आणि खडकवासलामध्ये त्या पिछाडीवर होत्या.
6 / 11
आता २०१९ नंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. इंदापूर क्षेत्रात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. २०१९ साली सुप्रिया सुळे यांच्या विजयात हर्षवर्धन यांचा मोलाचा वाटा होता. पण आता तेच भाजपात आहेत. तर पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं आहे.
7 / 11
विजय शिवतारे गेल्या निवडणुकीत संजय जगताप यांच्या विरोधात पराभूत झाले असले तरी गेल्या काही वर्षात पवार कुटुंबाची पकड या भागात कमी झाली आहे. विजय शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आगामी काळात फडणवीस स्वत: या भागात विशेष लक्ष देऊ शकतात.
8 / 11
दौंडमध्येही सुप्रिया सुळेंची पकड कमकुवत झाली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत याभागातून राहुल कुल यांनी विजय प्राप्त केला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आता निर्माण झालेल्या नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता वर्तविण्यात आहे. जेणेकरुन या मतदार संघात आणखी बळ देता येईल.
9 / 11
भोरमधीलही समीकरणं राष्ट्रवादीच्या विरोधात जात असल्याचं दिसून आलं आहे. अगदी किरकोळ मताधिक्य या भागातून सुळे यांना मिळालं होतं. कारण त्यावेळी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता. आता संग्राम थोपटे देखील राष्ट्रवादीबाबत नाराज असल्याची चर्चा आहे. ज्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर होतं. पण राष्ट्रवादीच्या विरोधानं ते शक्य होऊ शकलं नाही असं सांगितलं जातं.
10 / 11
सध्याची राजकीय समीकरणं लक्षात घेता आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बारामती आपल्या हातात ठेवणं पवार कुटुंबीयांसाठी याआधीसारखं सोपं असणार नाही एवढं निश्चित.
11 / 11
त्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेलं एक विधानही अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. पवार कुटुंबीयांवर टीका करताना त्या म्हणाल्या होत्या की, ''A से अमेठी आणि B से बारामती'. म्हणजेच ज्या पद्धतीनं भाजपानं काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या अमेठीमध्येच धक्का दिला. त्याचपद्धतीनं बारामतीमधील पवारांचं वर्चस्व कमी करण्याचा भाजपाचा इरादा आहे.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBaramatiबारामतीSmriti Iraniस्मृती इराणी