ऑनलाइन लोकमत(मंडणगड) रत्नागिरी, दि.10 - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेले हवाईदलाचे जवान राजेंद्र यशवंत गुजर (२९) यांच्यावर सोमवारी रात्री त्यांच्या मूळ गावी पालवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वायूदल, सेनादल तसेच स्थानिक पोलिसांनी मंडणगडच्या या सुपुत्राला सलामी दिली. अरूणाचल प्रदेशात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या हेलिकॉप्टरचा मंगळवार ४ जुलै रोजी अपघात झाला. त्यात मंडणगड तालुक्यातील पालवणीचे सुपुत्र आणि वायू दलाचे जवान राजेंद्र गुजर यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. ९ रोजी त्यांचा मृतदेह सापडला. मात्र हवामान खराब असल्यामुळे मृतदेह सापडल्यानंतरही तो त्यांच्या मूळ गावी पालवणी-जांभूळनगर येथे आणण्यास दोन दिवस उलटले. शासन मृतदेह आणण्यासाठी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सोमवारी ग्रामस्थांनी केला. नियोजनानुसार गुजर यांचे पार्थिव रविवारी पालवणीत आणण्यात येणार होते. मात्र खराब हवामानामुळे सोमवारी सकाळपर्यंत हे पार्थिव पालवणीत पोहोचेल असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पार्थिव पोहोचायला सोमवारी सायंकाळचे सव्वासात वाजले. शासनाच्या हलगर्जीपणामुळेच एवढा उशीर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गुजर यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता विमानाने मुंबईत आणण्यात आले व तेथून पुढे वायूदलाच्या वाहनातून गावापर्यंत आले. राजेंद्र गुजर यांच्या पालवणी-जांभूळनगर येथील निवासस्थानी हे पार्थिव सव्वासात वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर केवळ १० मिनिटे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले व त्यानंतर गुजर यांचा अखेरचा प्रवास सुरु झाला. अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित होते. ‘राजेंद्र गुजर अमर रहे’ अशा घोषणा देत परिसरातील ग्रामस्थ, त्याचबरोबर आमदार भाई जगताप, आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह उत्तर रत्नागिरीतील सर्व नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी या अंत्ययात्रेत सामील झाले होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गुजर यांचे वडील यशवंत गुजर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी सेनादल, वायूसेना व स्थानिक पोलिसांनी राजेंद्र गुजर यांना अखेरची सलामी दिली. गाडीचा वेगही मंदावला-वायूसेनेच्या गाडीचा वेग मंदावल्याने मृतदेह पालवणीपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. १२ वाजता मुंबईत दाखल झालेले राजेंद्र गुजर यांचे पार्थिव गावी पोहोचण्यास तब्बल सात तास लागले. घाटातून तर ही गाडी अतिशय संथ गतीने पुढे सरकत होती. महिलांची लक्षणीय उपस्थिती-गुजर कुटुंबियातील यशवंत गुजर हे ही सैन्यात होते तर आताच्या पिढीतील राजेंद्र व त्यांचा मोठा भाऊ शाम हेही दोघे सैन्यात आहेत. त्यामुळे राजेंद्र गुजर यांच्या मृत्यमुळे परिसर हेलावून गेला होता. ग्रामीण भागात स्मशानापर्यंत न जाणारा महिलावर्गही आपल्या लाडक्या सैनिकाला निरोप देण्यासाठी थेट स्मशानभूमीपर्यंत जाताना दिसला. लाडक्या सैनिकाला निरोप देताना साºयांचे डोळे पाणावले.