अजित पवारांचं 'मिशन डॅमेज कंट्रोल'; शरद पवारांना बसणार ३ मोठे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:53 IST
1 / 9लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते.2 / 9अजित पवारांची साथ सोडत अनेक शिलेदारांनी शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली होती. यातील बहुतांश नेत्यांना शरद पवारांनी विधानसभेची उमेदवारीही दिली होती.3 / 9लोकसभेत जोरात वाजलेली तुतारी विधानसभा निवडणुकीत मात्र निष्प्रभ ठरली. शरद पवारांच्या पक्षाला केवळ १० जागांवरच विजय मिळवता आला.4 / 9दुसरीकडे, अजित पवारांच्या पक्षाने ४१ जागांवर विजय खेचून आणला आणि राज्यातही महायुतीने पुन्हा सत्ता काबीज केली.5 / 9सत्तासमीकरणे लक्षात घेत शरद पवारांकडे गेलेल्या अजित पवारांच्या अनेक शिलेदारांना घरवापसीचे वेध लागले आहेत.6 / 9राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेल्या सतीश चव्हाण यांनी पुन्हा एकदा घड्याळ हाती बांधलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्यावर केलेली ६ वर्षांसाठीची निलंबनाची कारवाईही मागे घेतली आहे.7 / 9'सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून ६ वर्षासाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेले होते. मात्र सतीश चव्हाण यांनी १३ जानेवारी रोजी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास व्यक्त करून पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्याचे समक्ष सांगितले असल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्यात येत आहे,' अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.8 / 9पिंपरी चिंचवडमध्येही पुन्हा एकदा अजित पवारांची ताकद वाढणार आहे. कारण माजी आमदार विलास लांडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनीही पुन्हा अजित पवारांच्या पक्षात जाण्याचे निश्चित केल्याचे समजते.9 / 9अजित गव्हाणे यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे नगरसेवकही पुन्हा अजित पवारांच्या नेतृत्वात काम करणार आहेत.