शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 1:46 PM

1 / 10
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ८० पैकी ३७ जागा जिंकून समाजवादी पक्षाने राष्ट्रीय राजकारणात त्यांचं स्थान अधोरेखित केले आहे. समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा हा सर्वोत्तम निकाल आहे. लोकसभेच्या संख्याबळात देशातील तिसरा मोठा पक्ष म्हणून समाजवादी पक्ष पुढे आला आहे.
2 / 10
सपाच्या या यशानंतर आता अखिलेश यादव पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावा या रणनीतीवर काम करत आहेत. आता अखिलेश यादव यांची नजर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर आहे. त्यासाठी शुक्रवारी मुंबईत समाजवादी पक्षाच्या खासदारांचं संमेलन आयोजित केले आहे.
3 / 10
अखिलेश यादव १२ जुलैला अंबानी कुटुंबातील लग्न सोहळ्याला हजर होते, त्यानंतर १३ जुलैला त्यांनी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. आता सपाच्या खासदारांचं मुंबई स्वागत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे.
4 / 10
समाजवादी पक्ष आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं रणशिंग या कार्यक्रमातून फुंकणार असल्याचं बोललं जाते. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाच्या खासदारांचे स्वागतच नाही तर निवडणुकीवर रणनीती आखण्याची चर्चाही होणार आहे.
5 / 10
महाराष्ट्रात अखिलेश यादव हे पीडीए फॉर्म्युल्यावर काम करणार आहेत. सपा खासदार आधी मनी भवनला जातील तिथे महात्मा गांधींना अभिवादन करतील तिथून चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतील. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर आणि माहिम दर्ग्यालाही भेट देण्याची शक्यता आहे.
6 / 10
आगामी निवडणुकीत दलित, वंचित आणि मुस्लीम समुदायाला सोबत आणण्याचा प्लॅन समाजवादी पक्षाकडून आखला जात आहे. समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत PDA ( पिछडा, दलित अल्पसंख्याक) फॉर्म्युल्यावर विजय मिळवला. आता हीच रणनीती महाराष्ट्र विधानसभेला वापरण्याचं ठरवण्यात येत आहे.
7 / 10
अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय महासचिव इंद्रजित सरोज यांना महाराष्ट्राचं प्रभारीपद दिलंय. ते दलित समाजातून येतात. तर प्रदेशाध्यक्षपद अबू आझमींकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुस्लीम-दलित समीकरणावर सपाचा जोर आहे. सपा खासदारांचा मुंबई दौरा हा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे.
8 / 10
उत्तर प्रदेशात सपानं काँग्रेससह मिळून लोकसभा निवडणूक लढली. परंतु महाराष्ट्रात ते इंडिया आघाडीचा भाग नाहीत. याठिकाणी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी एकत्र येत विधानसभा निवडणूक लढण्याचं प्लॅनिंग केले आहे. सपाला या आघाडीत स्थान मिळेल की नाही हे चित्र स्पष्ट नाही.
9 / 10
लोकसभा निवडणुकीत सपानं महाराष्ट्रात १ जागा मागितली होती. परंतु ती मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी सपानं मुंबईत राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आगामी विधानसभा, महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यासाठी तयार राहा असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
10 / 10
समाजवादी पक्षानं महाराष्ट्रात १२ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. जर ते इंडिया आघाडीत सहभागी झाले तर ८ ते १० जागांवर लढण्यास सहमत होऊ शकतात परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार सपाला महाराष्ट्रात राजकीय मैदान देण्यास तयार होतील का यावर पुढचे गणित अवलंबून आहे. कारण सपाची ज्या मतांवर नजर आहे ती सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे.
टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४