मध्यरात्री २ वाजता फोन, पहाटे ४ ला फडणवीसांची भेट; चंद्रकांत पाटील मंत्री कसे बनले? By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:10 PM
1 / 10 महाराष्ट्राच्या राजकारणात २०१४ नंतर एक नाव प्रखरतेने समोर आलं ते म्हणजे चंद्रकांत पाटील, २०१४ साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना भाजपानं मंत्रिपद दिले. या मंत्रिपदामुळे चंद्रकांत पाटील भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या रांगेत पुढे आले. 2 / 10 भाजपाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात चंद्रकांत पाटलांचा समावेश होता. मात्र २०१४ पूर्वी चंद्रकांत पाटील इतके प्रकाशझोतात नव्हते. भाजपा म्हटलं तर गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस ही नावे समोर असायची. मात्र चंद्रकांत पाटील हे कोण याबाबत अनेकांना कल्पना नव्हती. त्यांच्या मंत्री बनण्यामागचं गुजरात कनेक्शन काय हे जाणून घेऊया. 3 / 10 राजकारणात संबंधापेक्षा विश्वास शब्द महत्त्वाचा आहे. १३ वर्ष गुजरातमध्ये काम करत असताना, मी १९८२ मध्ये महाराष्ट्र-गुजरात दुवा झालो. तेव्हा विद्यार्थी परिषदेतून अमित शाह राजकारणात आले होते. त्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यासाठी पालकत्व म्हणून शाहांनी माझी जबाबदारी स्वीकारली असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 4 / 10 विद्यार्थी परिषदेच्या कामकाजासाठी पालकांना भेटणे, यामुळे अमित शाहांसोबत माझी खूपदा भेट झाली. त्यातून माझ्याबाबतचा विश्वास वाढला. पूर्णवेळ प्रचारक हा त्याचं कुटुंब सोडून संघटनेसाठी काम करत असतो. त्याची सगळी काळजी संघटना घेते. त्याची जबाबदारी तिथल्या वरिष्ठ नेत्याला दिली जाते. 5 / 10 पूर्णवेळ प्रचारक हा हॉटेलमध्ये राहत नाही, बाहेरचे जेवत नाही, संघटना जिथे सांगेल तिथे काम करायचं. या कार्यकर्त्याची जबाबदारी पालक म्हणून त्या नेत्याची असते, त्याची तब्येत, त्याला घरची आठवण येते का, त्याला काय हवं हे तो पालक म्हणून बघत असतो, ते काम शाह करत होते असं पाटील यांनी सांगितले. 6 / 10 १९७५-७७ मध्ये संघावर बंदी आणण्यात आली तेव्हा नरेंद्र मोदींना विद्यार्थी परिषदेचं काम करायला संघाने सांगितले. ७५-७७ आणि गुजरातमध्ये चिमणभाई पटेल यांच्याविरोधात मोहिम उभी राहिली, त्याचं नेतृत्व विद्यार्थी परिषदेला दिले. बिहारचे सुशील कुमार मोदी नेतृ्त्व करायचे. संघावर बंदी आल्यानं ABVP नरेंद्र मोदींना काम करण्यास सांगितले. तेव्हा नरेंद्र मोदींची नाळ त्या काळात जास्त जोडली गेली अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली. 7 / 10 मी जेव्हा तिथे काम करत होतो, तेव्हा विद्यार्थी परिषदेचे कामात त्यांनी रस दाखवला. विद्यार्थी परिषदेचे अहमदाबादचं कार्यालय हे त्या चळवळीचं केंद्र बनलं. त्या कार्यालयासोबतही मोदींची नाळ जोडली गेली. त्या कार्यालयातच मी राहायचो. बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत आम्ही बोलत असायचो असंही चंद्रकांत पाटील यांनी आठवण करून दिली. 8 / 10 काळानुरूप भेटीगाठी, चर्चा कमी झाली. पण परिचय आणि विश्वास राहिला. २०१४ ला अचानक मी मनोरा आमदार निवासात झोपलो होतो, तेव्हा रात्री २ वाजता मला अमितभाईंचा फोन आला, देवेंद्र दिल्ली से निकला है, २ घंटे मै मुंबई आयेगा, आप उनसे जाके मिलो असा निरोप दिला. 9 / 10 का भेटायचे, कशाला असे प्रश्न विचारण्याची सवय नसल्याने मी पहाटे ४ वाजता देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलो. देवेंद्रजींचा स्वभाव असा आहे की ते कधी काही लवकर उघड करत नाही. ते म्हणाले भूक लागलीय आधी जेवून घेऊ, पण मला पहाटे ४ वाजता भेटायला का सांगितलंय ते सांगा ना असं मी फडणवीसांना म्हटल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 10 / 10 मग जेवण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, उद्या शपथ घ्यायचीय....मग मी का घ्यायची असं विचारलं, तर वरून सांगितलं आहे. असा हा सगळा मंत्रिपदाचा प्रवास आहे असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत किस्सा सांगितला. आणखी वाचा