ऑनलाइन लोकमतठाणे, दि. २२ - विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी व्हर्च्यूअल क्लासरूम उपक्रमाचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, उपमहापौर राजेद्र साप्ते, सभागृह नेत्या अॅड. सौ. अनिता गौरी, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, स्थानिक नगरसेवक विलास सामंत, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व नगरसेवक नरेश म्हस्के, नगरसेवक हिराकांत फर्डे, विकास रेपाळे, रिलायन्सचे संचालक सुब्रतो रथो, अतिरिक्त आयुक्त(२) अशोककुमार रणखांब, एसआरडी सोल्यूशनच्या डॉ. सोनाली लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाच्या माझ्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच, करीअर मार्गदर्शन आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायला हवे याचेही मार्गदर्शन करायला हवे असे सांगितले. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात नवी पहाट झाल्याचे सांगितले.या उपक्रमातंर्गत ठाणे महानगरपालिकेच्या १९ क्रमांक शाळेच्या पहिल्या मजल्यावर दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. या स्टुडिओमधून प्रसारित करण्यात येणारी शैक्षणिक व्याख्याने महापालिकेच्या १० मराठी आणि ३ उर्दू शाळांमधील १० वीच्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी एेकता येणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व व्याख्याने संवादात्मक असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मनात असलेल्या प्रश्नांची उत्तर् त्यांना त्याचवेळी मिळू शकणार आहेत. अशा पद्धतीचा उपक्रम राबविणारी ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसरी महापालिका आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे व्हर्च्यूअल क्लासरूम उभारण्यात आले असून एसआरडी सोल्यूशन्स या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या व्हर्च्यूअल क्लास रूमसाठी महापालिेकेच्या शाळांमधील शिक्षकांनाही व्हर्च्यूअल स्टुडिओमध्ये कसे बोलावे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमाचा फायदा महापालिका शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांनी फायदा होणार असून पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या १३ मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता १० वीच्या एकूण १३५८ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे.(छायाचित्र- विशाल हळदे)