शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेलरोको, लाठीचार्ज, दगडफेक अन् उद्रेक; बदलापुरात १२ तासांत नेमकं काय-काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:24 PM

1 / 17
बदलापुरातील एका शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं राज्यभरातील समाजमन अस्वस्थ झालं आहे.
2 / 17
शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने ४ वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले.
3 / 17
संतापजनक बाब म्हणजे पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना तब्बल १२ तास रखडवून ठेवले आणि १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
4 / 17
संतप्त बदलापूरकरांनी आज शाळा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला घाम फोडला. राजकारण्यांची मदत न घेता बदलापूरकरांनी या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवली.
5 / 17
प्रशासनाने दाखवलेला बेजबाबदारपणा पालकांना असह्य झाल्याने आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन निदर्शने करण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता.
6 / 17
या आंदोलनात महिला पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर तरुण मंडळीदेखील या आंदोलनात उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
7 / 17
शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केल्यानंतर घटनेचा निषेध करण्यासाठी आज पालकांनी सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली.
8 / 17
बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला काही वेळानंतर हिंसक स्वरूप आले. पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन करणाऱ्यांनी दगडफेक केली.
9 / 17
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताच रेल्वे प्रवाशांनी आणि आंदोलन करणाऱ्यांनी देखील दगडफेक करून उत्तर दिले. प्रवाशांचा संताप पाहून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनी माघार घेत सुरक्षित स्थान गाठले. बदलापूरकरांचा हे रौद्र रूप पाहून पोलीसही स्तब्ध झाले.
10 / 17
कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी देखील आंदोलकांसोबत अनेक वेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक 'फाशी द्या, फाशी द्या' या आपल्या घोषणांवरच कायम राहिले. त्यानंतर उल्हासनगरचे डीसीपी सुधाकर पाठारे यांनी देखील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात देखील त्यांना अपयश आले.
11 / 17
बदलापूर घटनेची मुख्यमंत्र्‍यांकडून गंभीर दखल- नागरिकांच्या आंदोलनानंतर या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
12 / 17
या प्रकरणात पोलिसांकडूनही अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याची माहिती उघड झाली. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
13 / 17
या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांनाही त्यांनी दिले आहेत.
14 / 17
आंदोलकांना पांगवण्यासाठी सायंकाळी पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज केला आणि तब्बल ८ तासांनंतर पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यात यश आलं आहे.
15 / 17
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया : 'शक्ती विधेयक कायदा आम्ही आणू शकलो नाही कारण गद्दारी करुन आमचं सरकार पाडलं गेलं. ज्यांनी गद्दारी केली त्यांची जबाबदारी आहे या शक्ती कायद्याची शक्ती गुन्हेगारांना दाखवून देण्याची. मला असं कळलं आहे की ती शाळा भाजपच्या लोकांशी संबधित होती. याच्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. जर का हा भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून सोडून देणार आहात का? कुठेही राजकारण न करता कारवाई झाली पाहिजे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
16 / 17
राज ठाकरे यांची प्रतिक्रिया : 'बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?' असा सवाल विचारत राज यांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.
17 / 17
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया : बदलापूर घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो, आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे,' अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे
टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र