ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १६ : "एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार", 'गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या' "गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला' अशा भावपूर्ण घोषणात, ढोल- ताशांच्या गजरात संपुर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गेले कित्येक आठवडे दडी मारलेल्या वरुणराजानेदेखील लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी हजेरी लावली. जवळपास महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाल्याने जणू बाप्पाच पावल्याचा आनंद बळीराजाला झाला. कोकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे़. या पावसाने गणेशभक्तांचा उस्ताह वाढवला. विसर्जनच्या मिरवणूकित तरुणाई बेधूंत होऊन नाचत होते. राज्यात अनेक ठिकाणी वरुणराजाने बाप्पाच्या निरोपाला पाऊस फुलांचा वर्षाव केला. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोकण, कोल्हापूर आणि कोल्हापूर सारख्या राज्यातील प्रमुख ठिकाणी गणेश मंडळांनी गणपतीचे जल्लोषात विसर्जन केले. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम-झांज वादनाच्या झंकारात, रंगीबेरंगी फुलांची आसमंतात उधळण करीत मंगलमय वातावरणात गणरायाला भावपुर्ण निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पांला निरोप देताना निरोप देताना सदगदीत झालेल्या भक्तजन गणरायाकडुन 'गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत जणू पुढल्या वर्षी लवकर येण्याचे वचन घ्यायला विसरले नाहीत. घरगुती बाप्पाच्या सजावटीपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीपर्यंत सगळीकडे भाविकांची लगबग सुरू होती. दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर काल बाप्पा आपल्या घरी परतणार म्हटल्यावर, अनेकांचे डोळे पाणावले होते. मात्र, भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी आनंदाने निरोप दिला. विशेष म्हणजे, यंदा अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, टाळ यांचा वापर केला गेला. गेल्या दहा दिवसांपासून गणेश भक्तांना सकारात्मक उर्जा व आनंद देणार्या गणरायाला निरोप देतांना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते. ढोल-ताशांच्या गजरात लेझीम पथकांसह हजारो भक्त आपापल्या गणेश मंडळांच्या अग्रभागी नाचण्यात दंग झाले होते. पोलीस यंत्रणेच्या नियोजनबध्दतेमुळे राज्यात किरकोळ घटना सोडल्या तर यंदा गणेश विसर्जन मिरवणूक शिस्तबध्दरित्या पार पडली, मात्र गणेश भक्तांच्या उत्साहाला कुठेही अडथळा निर्माण झाला नाही. राज्यातील हजारो भाविकांनी विसर्जन मिरवणूकीचा आनंद मनमुरादपणे लुटला. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जनरिमझिम पावसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला. सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली मानाच्या गणपतींची मिरवणुक संध्याकाळपर्यत चालली. गणेशभक्तीचे नानाविध रंग या मिरवणुकीत पाहायला मिळाले. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही मानाच्या गणपतींचे विसर्जन हौदांमध्ये झाले. १) पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती. चांदीच्या पालखीतून या बाप्पाची मिरवणूक निघाली. सनई चौघड्याला तुतारीची साथ, ढोलताशांच्या तालावर रंगलेला टिपरीचा खेळ, कलावंत तसंच कामायनीचं ढोलपथक या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य होतं. २) तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघाली होती. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठा होता. इतिहास संशोधक मंडळाने सादर केलेल्या जिवंत देखाव्याने शिवरायांचा इतिहास जागवला. ३) मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणुक फुलांच्या राजेशाही रथातून निघाली. ध्वजपथकाचा पदन्यासही चित्तवेधक होता. नेहमीप्रमाणे गुलालाची उधळण करत या गणपतीला निरोप देण्यात आला. ४) तुळशीबाग गणपतीची मूर्ती भव्य आणि देखणी आहे. फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ऑलंपिक २०२० च्या तयारीचा अनोखा रथ या मिरवणुकीत पाहायला मिळाला. विविध विषयांवरील समाजिक प्रबोधनपर रथदेखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ५) केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीत सनई चौघड्यांच्या जोडीला श्रीराम , शौर्य तसंच शिवमुद्रा ढोलताशा पथकं सहभागी झाली होती. त्याशिवाय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त सादर करण्यात आलेला देखावा लक्षवेधी होता. मुंबईत भर पावसात बाप्पाला निरोपडीजेचा दणदणाट, बँजोचा आवाज आणि त्यात हजेरी लावली ती धुवाधार पावसाने.... असे चित्र मुंबईमध्ये गणेश विसर्जनदरम्यान पहायला मिळाले. दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर ऐन अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देतानाच वरूण राजानेही उपस्थिती लावली. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असताना दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, संध्याकाळी ७ नंतर दमदार पावसाला सुरूवात झाली. मानाच्या गणेशगल्लीच्या बापांचे विसर्जन थाटात झाले. तर प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीलाही १२ वाजण्याच्या सुमारास आरतीनंतर सुरुवात झाली. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईभरातून लोक गर्दी करत असतात. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आज सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राज्याचा विसर्जन सोहळा पार पडेल. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन यापुढे शास्त्रोक्त पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष तराफा तयार करण्यात आला आहे. लिफ्ट पद्धतीचा तराफा तयार करण्यात आला आहे. शार्प शिपयार्ड कंपनीनं हा विशेष तराफा तयार केला आहे. त्यामुळे हा विसर्जनसोहळा अतिशय वेगळा असेल अशी आशा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीसांचा चोख बंदाबस्त३,५०० वाहतूक पोलिसांचा फौजफाटा अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील चौपाट्यांवर होणाऱ्या गणेश विसर्जनानिमित्ताने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस उपस्थित होते. मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल ३ हजार ३६ पोलिसांचा फौजफाटा होता. त्याचबरोबर, सशस्त्र दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान, स्वयंसेवकांसह विद्यार्थीही वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी जागोजागी तैनात होते. मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, वांद्रे आणि पवई येथे उभारण्यात आलेल्या पाच नियंत्रण कक्षांद्वारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोऱ्याद्वारे मिरवणुकांचे नियंत्रण करण्यात आले विसर्जनाला गालबोट; १४ मृत्यू जणांचा मृत्यू'पुढल्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला गुरूवारी मोठ्या जल्लोष्षात निरोप देण्यात आला. पण भक्ताच्या या आनंदाला गालबोट लागलं आणि राज्यभरात गणपती विसर्जनादरम्यान एकूण १४ जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. त्यामध्ये मालेगावमध्ये २, वर्ध्यात ३, सिन्नर ३, पुणे-३, नांदेड-३, त्र्यंबकेश्वर १, नाशिक १ अकोला १ अशाप्रकारे राज्यात एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत.