शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खंडणीतील आरोपी, हत्याऱ्यांचा म्होरक्या; तरीही वाल्मीक कराडवर मकोका का नाही? दबाव वाढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:12 IST

1 / 12
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं राज्यभरात संतापाची लाट उसळली. या हत्या प्रकरणातील सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून आठवा आरोपी अजूनही फरार आहे. तसंच ज्या वाल्मीक कराडवर देशमुख कुटुंबियांसह विविध नेत्यांनी हत्येशी संबंधित असल्याचे आरोप केले आहेत, त्या कराडला अद्याप खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी केलेलं नाही.
2 / 12
वाल्मीक कराड याच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. याच खंडणी प्रकरणातील इतर आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचा हत्येच्या गुन्ह्यातही सहभाग आहे. त्यामुळे खंडणी आणि हत्या ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.
3 / 12
वाल्मीक कराड याने खंडणी मागण्यासाठी पवनचक्की कंपनीच्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला फोन करून धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंगही सीआयडीच्या हाती लागले आहे.
4 / 12
बीडमध्ये संघटित गुन्हेगारी होत असून ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करू, असा शब्द स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिला होता.
5 / 12
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याला मात्र अद्याप मकोका गुन्ह्यात घेतलेलं नाही.
6 / 12
वाल्मीक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी खंडणीच्या गुन्ह्यातील तोच मास्टरमाइंड असल्याबाबतचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे कराडसाठीच काम करत असल्याचंही कॉल रेडॉर्डिंगमधून स्पष्ट झालं आहे. मग खंडणी प्रकरणाचा परिपाक म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या असेल तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ विचारत आहेत.
7 / 12
वाल्मीक कराड याची राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतची जवळीक सर्वश्रुत आहे. स्वत: मुंडे यांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. त्यामुळे कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आपल्या मंत्रि‍पदाचा वापर केला जात असल्याचा आरोप आता बीड जिल्ह्यातील आमदार-खासदारांकडून केला जाऊ लागला आहे.
8 / 12
खंडणी प्रकरणात गेल्या १३ दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार, की लांबणार हे ठरणार आहे.
9 / 12
सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल. २९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत.
10 / 12
कराडजवळ पोलीस अधिकाऱ्याची २४ तास ड्यूटी: वाल्मीक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी सीआयडीचे दोन अधिकारी कायम तैनात आहे. त्याचबरोबर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी शहरातील विविध पोलिस ठाण्यांतील एका अधिकाऱ्याला दररोज २४ तास ड्यूटी लावण्यात आली.
11 / 12
दररोज दोन तास चौकशी- वाल्मीक कराड याची खंडणी प्रकरणात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या १३ दिवसांपासून दररोज दोन तास चौकशी केली. उर्वरित २२ तास कराड यास शहर बीड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद करून ठेवले जात होते.
12 / 12
खुनाच्या गुन्ह्यातील टांगती तलवार- वाल्मीक कराड याने खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात वाल्मीक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले हेदेखील आरोपी आहेत. २९ नोव्हेंबरला खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही, म्हणून त्याच प्रकरणातील पुढचे पाऊल है ६ डिसेंबरला विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांनी टाकले का? खुनाचा व कराडांचा काही संबंध आहे का, हे कराड व इतर आरोपींच्या चौकशीतून सीआयडीला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे १४ जानेवारीला सीआयडी कराड याला न्यायालयात हजर करून पुढील मुद्दे मांडणार आहे.
टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडBeed policeबीड पोलीसDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस