ऑनलाइन लोकमत/जान्हवी मोर्येडोंबिवली, दि. 3 - डोंबिवलीत प्रथमच होत असलेल्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला शुक्रवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. डोंबिवलीचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या गणेश मंदिरापासून ही ग्रंथदिंडी निघाली. भारतीय राज्यघटनेची प्रत हे या ग्रंथदिंडीचे खास वैशिष्ट्य आहे. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष-ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, स्वागताध्यक्ष आणि आयोजक आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे आदी हे दिंडीच्या अग्रस्थानी होते. डोंबिवलीच्या विविध भागातील शाळांचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शहरातील विविध संस्था, वारकरी, महानुभाव पंथ, विविध भाषक गट यांच्यासह सामाजिक संस्था या दिंडीत सहभागी झाल्या आहेत. भारतीय संविधानाची प्रत, ग्रंथ यांचा ग्रंथदिंडीच्या पालखीत समावेश आहे. फुलांची आकर्षक सजावट केलेली पालखी ढोलाताशांच्या गजरात फडके रोडवरून निघाली. दिंडीच्या सुरुवातीला साहित्य संमेलनाचा चित्ररथ आहे. त्यात एका बाजूला घटनेची उद्देशिका, दुसऱ्या बाजूला पसायदान, शिवाय ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासह विविध संतांच्या प्रतिमांनी तो सजवण्यात आला आहे. शिवाय मुळाक्षरे गिरवण्यात आली आहेत. शिवाय 14 चित्ररथ, 18 लेझिम पथकेही आहेत. पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला, फेटे बांधलेले युवक, ढोल-ताशे, लेझिमची पथके, बाईकस्वार यांच्यामुळे या पालखीची रंगत वाढली आहे. महाराष्ट्रासह देशाला गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेची देणगी देणाऱ्या या शहराने साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीतही तोच स्वागत यात्रेचा उत्साह कायम ठेवला आहे. ही ग्रंथदिंडी फडके रोड, मानपाडा रोड, चार रस्ता, राजेंद्प्रसाद रोडमार्गे वाजतगाजत एमआयडीसी परिसरातील क्रीडा संकुलात पोहोचेल. तेथे भाषाप्रभू पु. भा. भावे यांच्या नावे साहित्यनगरी संजली आहे. तेथे ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्या नावे असलेल्या मुख्य मंडपात संध्याकाळी 4 वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहतील. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. ग्रंथदिंडी पु. भा. भावे साहित्यनगरीत पोहोचताच तेथे साहित्य संमेलनाच्या ध्वजाचे अनावरण मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होईल. यावेळी मनसेचे प्रमुख राजे ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लगेचच ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हे साहित्य संमेलन असून त्यात भाषा, स्त्री, युवक, बालसाहित्य, नवोदित साहित्य, बोलीभाषा यांच्याशी संबंधित भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. चर्चा, परिसंवाद होतील. एका उपमंडपाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्यात आले आहे, तर प्रत्येक प्रवेशद्वाराला वेगवेगळ्या मान्यवरांची नावे देण्यात आली आहेत.संमेलनाच्या समारोपाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हजर राहणार आहेत. आगरी समाजाने आणली रंगतअ. भा. साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान पटकावून आगरी समाजाने संमेलनत रंगत आणली आहे. आगरी बोलीचे खास दर्शन या संमेलनात होणार आहे. कवी अशोक नायगावकर, अध्यक्ष अक्षयकुमार काळे, महापौर राजेंद्र देवळेकर, स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांच्या प्रमुख उपस्थित साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी मुख्य सभा मंडपात दाखल मुख्य सभा मंडपात ध्वजारोहन संपन्न