bharat ratna awardees from Maharashtra
कर अमुचे जुळती... महाराष्ट्राची 'नवरत्न' ठरली आहेत 'भारतरत्न' By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 9:42 AM1 / 10प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे. यापैकी नानाजी देशमुख व भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे.2 / 10‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व म्हणजे, महर्षी धोंडो केशव कर्वे. २९ ऑक्टोबर १९५८ रोजी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यासाठी त्यांनी आपलं १०४ वर्षांचं जीवन समर्पित केलं होतं. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी हिंगणे येथे उभारलेल्या शाळेचेच पुढे भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला विद्यापीठात रूपांतर झाले. सात्त्विक वृत्ती, चिकाटी, ध्येयनिष्ठा आणि धवल चारित्र्याच्या बळावर त्यांनी सामाजिक कामांचा डोंगर उभा केला होता.3 / 10महाराष्ट्राला दुसरं भारतरत्न मिळालं 1963 साली महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या रूपानं. संस्कृत, धर्मशास्त्र, भारतीय विद्या (म्हणजे इंडोलॉजी), हिंदू तसंच मुस्लीम कायदा, याबरोबरच फ्रेंच आणि जर्मन भाषेचा अभ्यास असलेल्या पां. वा. काणे यांचा जन्म 7 मे 1880 मध्ये चिपळूणमधल्या पेढे परशुराम इथं झाला. दापोलीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले होते. काणेंनी संस्कृत साहित्य आणि इतर अनेक विषयांवर विपुल लेखन केलं. 'हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र' या त्यांच्या ग्रंथाच्या चौथ्या खंडाला 1956 साली साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं होतं. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. केशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. 4 / 10थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक विनायक नरहरी भावे अर्थात विनोबा भावे. जन्म ११ सप्टेंबर, १८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र. १९२१ मध्ये वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची एक शाखा निघाली, तेव्हा तिचे नेतृत्व गांधीजींनी विनोबांवर सोपवले होते. व्यासंग आणि आचारशुद्धता यामुळे विनोबांना ‘आचार्य’ ही पदवी देण्यात आली. गांधीकुलाचे ते आचार्य होते. विनोबा हे गांधीजींचे अध्यामिक वारसदार होते. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.5 / 10भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. गरीब, शोषित, दलित आणि महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे. 6 / 10विश्वासाचं दुसरं नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा समूहाला आणि देशालाही नव्या उंचीवर घेऊन जाणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणजे जे आर डी टाटा. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी टाटा उद्योग समूहाची धुरा सांभाळली. त्या वेळी त्यांच्या 22 कंपन्या होत्या. ते निवृत्त झाले, त्या वेळी समूहाच्या 95 कंपन्या होत्या. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. 1932 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या 'टाटा एअरलाइन्स'चीच आज 'एअर इंडिया' झाली आहे. जे आर डींना 1992 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.7 / 10आपल्या स्वर्गीय स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 2001 मध्ये सर्वोच्च भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.8 / 10हिंदुस्थानी संगीताच्या स्वरप्रभेने सारे विश्व प्रकाशमान करणारे स्वरभास्कर, भारतीय संगीत विश्वातील इतिहासपुरुष, ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.9 / 10'क्रिकेटचा देव' म्हणून जगात ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर म्हणजे महाराष्ट्राची शान अन् देशाचा अभिमान. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात भारताचा झेंडा डौलानं फडकवण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या 'आपल्या सचिन'ला 2014 मध्ये भारतरत्ननं गौरवण्यात आलं. 10 / 10नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कडोली गावचा. शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात गेले आणि तिथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिट्स पिलानीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. नंतर त्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेशात कामाला सुरुवात केली. पुढे जनसंघ व जनता पार्टी यांमध्येही ते सक्रिय होते. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते. काही काळ ते खासदारही होते. वयाच्या 60 व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी चित्रकुटमध्ये जाऊन आदिवासी व मागास समाजात काम सुरू केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications