शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आदित्य ठाकरेंसह १५ जणांची आमदारकी रद्द होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 10:27 AM

1 / 11
विधान परिषदेच्या १० जागांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला फटका बसला आहे. उद्धव ठाकरे गटासोबत केवळ १६ आमदार राहिले असून दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार शिंदे गटात सहभागी झाले.
2 / 11
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची नेमणूक केली. परंतु एकनाथ शिंदे यांनी ही निवड बेकायदेशीर असल्याचं म्हणत थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.
3 / 11
शिवसेनेत मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यात चढाओढ लागली आहे. विधानसभा अध्यक्षनिवडीसाठी व्हिप झुगारून ३९ आमदारांनी केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली केली असल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केला.
4 / 11
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील बंडाळी आणखी ठळकपणे दिसून आली. शिवसेनेच्या ३९ बंडखोरांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात मतदान केले. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केले.
5 / 11
त्यामुळे आपण (राहुल नार्वेकर) विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील १३ कोटी जनतेला शंका आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले, तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हिपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या १६ आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही, असे सांगत व्हिपची चर्चा बाजूला ठेवूया असे म्हणाले.
6 / 11
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहिले. या पत्रात प्रभू यांनी, पक्षाच्या आदेशाविरोधात ३९ आमदारांनी मतदान केले असून त्याची नोंद घ्यावी, अशी विनंती केली. उपाध्यक्षांनी हे पत्र रेकॉर्डवर आणले
7 / 11
तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. पक्षाच्या १६ आमदारांनी आदेशाविरोधात मतदान केल्याचे पत्रात म्हटले आहे त्यामुळे शिवसेनेत व्हिप नक्की कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे.
8 / 11
मात्र विधिमंडळाने अजय चौधरी यांची गटनेते म्हणून मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेते म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवालयाने पाठवले आहे. तसेच भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे.
9 / 11
तर या निर्णयाविरोधात अजय चौधरी यांनी सरकारवर टीका केली आहे. पाशवी बहुमत सत्ताधाऱ्यांकडे आहे. नियमांची पायमल्ली करून काम करण्याचा नवी प्रथा सुरू केलीय. परंतु आपण याबाबत न्यायालयाकडे दाद मागू. आज याबाबत बैठक होणार आहे अशी माहिती चौधरींनी दिली.
10 / 11
तर दीपक केसरकर शिवसेनेत कधी आले. राष्ट्रवादीतून साडेसात वर्षापूर्वी शिवसेनेत आले. शिवसेना खरी कुठली याची काळजी त्यांनी करू नये. आम्ही न्यायालयात हे सिद्ध करू असा इशाराही शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी दिला आहे.
11 / 11
११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यात जर शिवसेनेच्या विरोधात निकाल लागला तर आदित्य ठाकरेंसह १५ जणांची आमदारकी रद्द होण्याची टांगती तलवार असल्याने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढू शकते.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरे