हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण? By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 3:05 PM
1 / 10 जून महिन्यात देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. या निकालात अबकी बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे देशात भाजपा कमकुवत झाली, इंडिया आघाडीची ताकद वाढली असं बोललं गेले. लोकसभा निकालाची पुनरावृत्ती हरयाणासह इतर राज्यांच्या निवडणुकीत होईल असं विश्लेषकांना वाटलं. 2 / 10 हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ५० पेक्षा अधिक जागा जिंकणार असा कौल सर्वच एक्झिट पोलने दिला. राजकीय विश्लेषकही भाजपाला हरयाणात फटका बसेल असं बोलत होते. काँग्रेस हरयाणा सत्तेत येणार असं प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांचा दावा होता. परंतु प्रत्यक्ष निकालात भाजपाने काँग्रेसला चारीमुंड्या चीत करून पुन्हा राज्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. 3 / 10 ८ ऑक्टोबरच्या निकालात हरयाणातील ९० पैकी ४८ जागांवर भाजपा विजयी झाली त्यामुळे काँग्रेसच्या विजयाच्या स्वप्नावर पाणी फिरलं. या विजयामुळे भाजपा हरयाणात सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणारी पहिलीच पार्टी बनली. आता हरयाणाच्या या निकालाचे पडसाद आगामी महाराष्ट्र, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या १० पोटनिवडणुकीवर होतील असं सांगितले जाते. 4 / 10 हरयाणातील पराभवामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली तर भाजपाने पुन्हा कमबॅक केले. महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या राज्यात काँग्रेसला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्रातही काँग्रेसवर इतर मित्रपक्षांचा दबाव वाढला आहे. हरयाणा निकालामुळे जागावाटपात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते. 5 / 10 हरयाणाचा निकाल दुर्दैवी असून काँग्रेसनं धडा घेतला पाहिजे. जिथे काँग्रेस मजबूत तिथे ती एकटी लढते, मित्रपक्षांना घेत नाही हे भाजपाचेच धोरण असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली. इतकेच नाही तर जर तुम्हाला स्वबळावर लढायचे असेल तर जाहीर करा, प्रादेशिक पक्ष त्यांची भूमिका घेतील असा इशाराही संजय राऊतांनी काँग्रेसला दिला. 6 / 10 महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसने १२५ जागा लढवल्या होत्या. त्यातील ४४ जागांवर काँग्रेस जिंकली. मात्र २०१९ च्या राजकीय सत्तानाट्यामुळे बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ राष्ट्रवादीलाच नाही तर शिवसेना ठाकरे गटालाही जागा सोडाव्या लागणार आहेत. 7 / 10 राज्यातील २८८ मतदारसंघातील जागावाटपावरून महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक २१ जागा ठाकरे गटाला दिल्या, त्याखालोखाल काँग्रेसनं १७ जागा लढवल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागांवर निवडणुकीत उमेदवार उभे केलेत. 8 / 10 महाराष्ट्रातील लोकसभेचे निकाल पाहिले तर त्यात महाविकास आघाडीचे ३१ जागा जिंकल्या, त्यात सर्वाधिक १४ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ८ आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाने ९ जागा जिंकल्यात. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात काँग्रेसनं अधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केला. 9 / 10 आता हरयाणा विधानसभेच्या निकालामुळे ठाकरे गटाने काँग्रेसवर कुरघोडी सुरू केली आहे. बार्गेनिंग पॉवरमध्ये काँग्रेसला बॅकफूटवर जाण्यासाठी मित्रपक्षांचा दबाव वाढला आहे. हरयाणा निकालाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसवर दबाव टाकण्याची आयती संधी सोडत नाही. मित्रपक्षाशिवाय काँग्रेस भाजपाला हरवू शकत नाही असं अप्रत्यक्षपणे ठाकरे गट काँग्रेसला सुनावत आहे. 10 / 10 दुसरीकडे हरयाणा निकालामुळे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे. हरयाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने महाराष्ट्रातील महविकास आघाडीच्या नेत्यांनी काय बोलायचे याची तयारी करून ठेवली होती. या नेत्यांना, सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याला आता मला विचारायचे आहे की, आता कसं वाटतंय? असं सांगत जे हरयाणात घडले तेच महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात घडणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. आणखी वाचा