शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 1:30 PM

1 / 10
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपा आणि शिंदे गटाने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत तब्बल ४० आमदारांना सोबत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात आव्हान दिले. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले.
2 / 10
राज्यात घडलेल्या या राजकीय घडामोडींमध्ये भाजपाचा महत्त्वाचा रोल होता. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपानं संख्याबळ नसताना अतिरिक्त उमेदवार दिले आणि ते जिंकून दाखवले. या विजयात सर्वात मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा होता.
3 / 10
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार चालवण्याची मोठी कसरत त्यांना करावी लागली. सत्तेत राहूनही शिवसेना विरोधाची भूमिका घेत होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी जुळवून घेत फडणवीसांनी ५ वर्ष यशस्वीरित्या मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेहमी चांगले संबंध राहिले.
4 / 10
मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात ऐतिहासिक सत्तांतर घडले. निवडणुकीपूर्वी युती असणाऱ्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि राज्यात मविआचं सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरेंच्या या खेळीमुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजपा विरोधी पक्षात होती आणि फडणवीसांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न धुळीस मिळालं.
5 / 10
महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी धुरा हाती घेतली. या अडीच वर्षाच्या काळात फडणवीसांनी त्यांचा प्रशासकीय अनुभव गाठिशी धरून ठाकरे सरकारवर आक्रमक हल्ला केला. सचिन वाझे प्रकरण, १०० कोटी वसुली टार्गेट, नवाब मलिक यांचे दहशतवाद्यांसोबत जमीन व्यवहार अशा विविध माध्यमातून फडणवीसांनी मविआ सरकारची कोंडी करण्याच प्रयत्न केला.
6 / 10
त्यानंतर राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच मविआतील अंतर्गत नाराजी उघड करण्याची संधी भाजपाला मिळाली. संख्याबळ नसताना या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मविआ सरकारला हादरा बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. आणि पुन्हा एकदा राज्यात भाजपानं सरकार आणलं. मात्र या सर्व काळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध ताणले गेले.
7 / 10
शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी भावना शिंदे गटातील आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.
8 / 10
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सर्वांची तोंडं बंद केली आहेत. फडणवीस म्हणाले की, राजकारणात कोण काय म्हणतं याला महत्त्व नसतं. परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्त्व असतं. त्यामुळे कोण काय बोललो, हा काय बोललो यावर उत्तर देण्याइतका मी रिकामटेकडा नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येण्याला पूर्णविराम दिला आहे.
9 / 10
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मैत्रीचे संबंध २०१९ च्या निकालानंतर चांगलेच ताणले गेले. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन उद्धव ठाकरेंनी घेतले नाहीत. युतीत निवडणूक लढवून महाविकास आघाडीची स्थापना करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद घेतले हे देवेंद्र फडणवीसांच्या जिव्हारी लागले. त्यामुळे आगामी काळात फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
10 / 10
मात्र अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे संबंध चांगले बनले आहेत. फडणवीसांनी पक्षाचा आदेश मानत उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या. या पत्राचा उल्लेखही फडणवीसांनी विधानसभेत करत त्यांचे जाहीर आभार मानले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जात त्यांच्याशीही दीड तास बंद दाराआड चर्चा केली. उद्धव ठाकरे विश्वासार्ह माणूस नाही असं वक्तव्य राज यांनी जाहीर मुलाखतीत केले होते.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा