By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 21:47 IST
1 / 10राज्यात मागील काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं. 2 / 10राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष नवा नाही. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यभरात शिवसैनिकांनी राणेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नारायण राणेंच्या जुहू बंगल्यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. 3 / 10नारायण राणे(Narayan Rane) यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर राणे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटली. उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी स्वातंत्र्यदिनादिवशी केलेल्या विधानावरुन राणे यांनी केलेले विधान शिवसेनेला चांगलेच जिव्हारी लागले. 4 / 10रातोरात शिवसेनेनं(Shivsena) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घ्यायचा हे ठरवलं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी राणेंविरोधात नाशिकमध्ये पहिला गुन्हा नोंद झाला. इतर राज्यभरात शिवसैनिकांनी राणेंविरुद्ध आंदोलन करतं भाजपावर निशाणा साधला. 5 / 10संतप्त शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर हल्ला करत नारायण राणे यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलीस निघाले. केंद्रीय मंत्री असल्याने राणेंना अटक होईल का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. परंतु सत्ताधारी ठाकरे सरकारनं नारायण राणेंना अटक करुन दाखवली. 6 / 10त्यानंतर कोर्टाने नारायण राणेंना जामीन मंजूर केला. हायकोर्टानेही या प्रकरणात राणेंना काहीसा दिलासा दिला. मात्र त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेचा पुन्हा समाचार घेतला. माझ्याकडे बरीच जुनी प्रकरणं असून योग्य वेळी ती बाहेर काढणार असल्याचं राणे म्हणाले. 7 / 10त्यानंतर चिपी विमानतळाच्या उद्धाटनावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नारायण राणे यांनी चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेनेने घेऊ नये असा टोला लगावला तर शिवसेना खासदार विनायक राऊतांनीही राणेंवर जहरी टीका केली. 8 / 10त्याच दरम्यान आज पुणे पोलिसांकडून राणे कुटुंबातील नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. DHFL कंपनीकडून आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे(Nilam Rane) यांनी DHFL कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. 9 / 10या कर्जातील २५ कोटी परतफेड झाली नाही. त्यामुळे DHFL कंपनीने राणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. DHFL कंपनीकडून आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कर्ज घेतलं होतं. मात्र नितेश राणे यांनी हे आरोप फेटाळून लावले. आम्ही कर्ज फेडण्यास तयार आहोत असं पत्र दिल्याचा दावा त्यांनी केला. 10 / 10पण त्याचसोबत नितेश राणे यांनी थेट ठाकरे कुटुंबातील मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनाही लुकआऊट नोटीस जारी करण्याची मागणी केली. नितेश राणेंनी ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंचे पार्टनर असलेले नंदकिशोर चतुर्वेदी गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता किंवा फरार आहेत. ही व्यक्ती कुठे आहे? पुणे गुन्हे शाखेने आदित्य ठाकरेंनाही लुकआऊट नोटीस जारी करावी जेणेकरून ते देश सोडणार नाहीत असं म्हटलं आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेना हा संघर्ष येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.