शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठी ऑफर; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 8:26 AM

1 / 10
मागील महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेतली. त्यांना शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांनी साथ दिली.
2 / 10
५० आमदारांनी सरकारविरोधात भूमिका घेतल्यानं राज्यातील मविआ सरकार अल्पमतात आले. बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले.
3 / 10
आता या सरकारच्या कॅबिनेट विस्ताराबाबत विविध चर्चा पुढे येत आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार भाजपानं मनसेला मोठी ऑफर दिली आहे.
4 / 10
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर भाजपानं दिली आहे. याबाबत भाजपानं मनसेशी संपर्क केला आहे. सध्या अमित ठाकरे विधानसभा अथवा विधान परिषद सभागृहाचे सदस्य नाही. तरीही भाजपानं हे धोरणात्मक पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
5 / 10
मात्र या ऑफरबाबत सध्या कुठेही वाच्यता नाही. मनसे नेत्यांनी अशाप्रकारे ऑफरची माहिती नसल्याचं सांगितले आहे. भाजपा नेत्यांनीही यावर मौन बाळगलं आहे. परंतु राज ठाकरेंनी भाजपाची ही ऑफर नाकारल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
6 / 10
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही आहेत. बुधवारी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेणार होते. परंतु काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
7 / 10
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजपानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण केले आहे. शिंदे गटासोबत केवळ आमदारच नाही तर काही खासदार, नगरसेवकही आता सहभागी होत आहेत.
8 / 10
मुंबईतही शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतला. म्हात्रे यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
9 / 10
त्यात राज ठाकरे यांच्या मनसेला बळ देऊन भाजपा उद्धव ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न करणार आहेत. राज ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा भाजपाला फायदेशीर ठरू शकतो अशीही चर्चा आहे. तसेच मागील काळात भाजपा-मनसे यांची जवळीक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
10 / 10
राज्यातील सत्तानाट्यात भाजपाच्या विनंतीवरून राज ठाकरे यांच्या एकमेव आमदाराने विधानसभा सभागृहात शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे आगामी काळात मनसे सत्तेत सहभागी असणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Thackerayअमित ठाकरे