शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:19 IST

1 / 10
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ८, काँग्रेसचे ३ आणि भाजपचे २, अशा १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी दुपारी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. हा आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता पवारांसोबत नगराध्यक्षांसह चार नगरसेवक उरले आहेत.
2 / 10
कर्जत नगरपंचायतमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आठ आणि काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचेसोबत रविवारी रात्री गोपनीय बैठक झाली. यावेळी आमदार रोहित पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला.
3 / 10
त्यानंतर सोमवारी दुपारी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधातील अविश्वास ठराव वरील नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी दुपारी दाखल केला. तीन वर्षांपूर्वी कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एकहाती सत्ता मिळवत भाजपाच्या प्रा. राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १२, काँग्रेस ३ आणि भाजपला २ जागा मिळाल्या होत्या.
4 / 10
नगराध्यक्षपदी शरद पवार गटाच्या उषा राऊत, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची निवड झाली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. बंडाळी झाल्यानंतर सोमवारी कर्जत येथे नगराध्यक्षा उषा राऊत, नगरसेवक नामदेव राऊत, अमृत काळदाते, प्रतिभा भैलुमे यांनी पत्रकार परिषद घेतली.
5 / 10
यावेळी नामदेव राऊत म्हणाले, संख्याबळ असल्याने राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद व काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद मिळाले. त्यांचा काळ वरिष्ठ नेत्यांच्या शब्दानुसार ठरविण्यात आला. उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी सव्वा वर्षात राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तो दिला नाही. राजकारणात सहकारी मित्रांना पदाची महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही. पण त्यांनी तीच महत्त्वाकांक्षा उघडपणे आमदार रोहित पवारांच्या समोर व्यक्त करणे आवश्यक होते. तसे झाले नाही. नगराध्यक्षा उषा राऊत राजीनामा देण्यास मागेही तयार होत्या. आजही तयार आहेत.
6 / 10
नाराजीचे कारण काय ? - नामदेव राऊत हे पूर्वी भाजपामध्ये होते. तेव्हा ते नगराध्यक्ष होते. त्यानंतर ते उपनगराध्यक्ष झाले. आता ते रोहित पवारांसोबत आहेत. आताही त्यांच्या सुनबाई नगराध्यक्षा आहेत. एकाच घरात सत्ता राहत असल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. हेही अविश्वासामागील कारण सांगितले जाते. दरम्यान, उषा राऊत या केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकहितार्थ शासकीय योजना राबविण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्या आमच्या विश्वासास पात्र नाहीत, असे नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
7 / 10
'त्या' नगरसेवकांनी रोहित पवारांशी चर्चा करावी - नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांचा राजीनामा सोबत घ्यावा. क्षमता नसणारे काही नगरसेवक या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ते केवळ आमदार रोहित पवार आणि सुनंदा पवार यांच्या आशीर्वादाने. त्यांनी असे निघून न जाता आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चेसाठी बसावे. निश्चित त्यांच्या महत्वाकांक्षेचा सन्मान ते राखतील, असे आवाहन नगराध्यक्षा उषा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले.
8 / 10
अज्ञातस्थळी गेलेले नगरसेवक..- राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे छाया सुनील शेलार, ताराबाई सुरेश कुलथे, ज्योती लालासाहेब शेळके, सुवर्णा रवींद्र सुपेकर, लंकाबाई देवा खरात, संतोष मेहत्रे, भास्कर भैलुमे, सतीश पाटील तर काँग्रेसचे उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, मोनाली ओंकार तोटे, भाऊसाहेब तोरडमल अशा ११ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
9 / 10
हे सर्व नगरसेवक भाजपचे आश्विनी गजानन दळवी, मोहिनी दत्तात्रय पिसाळ या नगरसेवकांसह अज्ञातस्थळी गेले आहेत. ज्येष्ठ नेते प्रवीण घुले सोबत असल्याचे समजते. अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची तारीख कोणती मिळते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
10 / 10
घुले ठरले किंगमेकर - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेसचे नगरसेवक व प्रा. राम शिंदे यांच्यात बैठक यशस्वी करण्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण घुले यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. या सत्ताधारी नगरसेवकांत घुले यांना मानणारा ही वर्ग आहे. या सर्व नगरसेवकांची मोट बांधून त्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे. तत्पूर्वी केलेल्या फोटोसेशनमध्ये प्रवीण घुले दिसत असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या राजकीय घडामोडीत प्रवीण घुले हेच किंगमेकर ठरल्याची चर्चा आहे.
टॅग्स :Ram Shindeराम शिंदेRohit Pawarरोहित पवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस