ऑनलाइन लोकमत - मुंबई, दि, 21 - मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने सकाळी मुंबईच्या दिशेने येणा-या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेची सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. भायखळ्यापुढे लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विद्याविहार, ठाणे, विक्रोळी, भांडूप, कल्याण, डोंबिवली स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. काही प्रवाशांनी लोकलसेवा विस्कळीत झाल्याने पुन्हा घर गाठण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत रात्रभर पडलेला पाऊस सकाळी थांबला असला तरी याचा परिणाम तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवर झाला आहे. मध्य रेल्वे रखडली असताना पश्चिम आणि हार्बर रेल्वेही उशिराने धावत आहेत. हार्बर रेल्वे वाहतूक अर्धा तास उशिराने धावत असून पश्चिम मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही जवळपास १५ मिनिटं उशीरानं धावत आहेत. पावसाचा परिणाम मुंबईबाहेर जाणा-या ट्रेनवरही झाला होता. सकाळी 7:10 ला निघणारी सीएसटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस 9:00 वाजता सोडण्यात आली तर 8:05 ला निघणारी सीएसटी-बंगळुरु उद्यान एक्सप्रेसची वेळ 9:30 करण्यात आली. मुंबईत सोमवारी पहिल्याच तडाख्यात सखल बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने मुंबई महानगरपालिकेची नाले सफाई मोहिम तोंडावर आपटली. मंगळवारी पहाटे दक्षिण मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर अवघ्या दोन तासात मुंबई सेंट्रल नायर रूग्णालय परिसरात रस्ते पाण्याखाली गेले. आज मुंबईमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कुलाबा, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर, सायन आणि कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड व वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि जोगेश्वरीत जोरदार हजेरी लावली.मुंबईत गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला आहे. सोमवारपासून आज सकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई शहरात 24.88 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरांमध्ये 10.93 आणि पूर्व उपनगरात 27.37 मिलीमिटर पाऊस पडला आहे.