शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रात काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; कोणकोणते नेते स्पर्धेत? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:18 IST

1 / 9
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस राज्यात नेतृत्वबदल करणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. काँग्रेसे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी प्रचंड घसरल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा पटोले यांनी व्यक्त केली आहे.
2 / 9
नाना पटोले यांनी आजही प्रदेशाध्यक्षपदाबाबत भाष्य केलं. काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
3 / 9
काँग्रेस राज्यात नेतृत्वबदल करताना कोणाला संधी देणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असून काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
4 / 9
विजय वडेट्टीवार : विदर्भातून येणारे विजय वडेट्टीवार यांची आक्रमक नेते अशी ओळख आहे. त्यांनी यापूर्वी राज्यात कॅबिनेट मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलं आहे. तसंच ओबीसी चेहरा म्हणून ते राज्याला परिचित आहेत.
5 / 9
नितीन राऊत : नागपूरमधील काँग्रेस आमदार नितीन राऊत हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत. तसंच दलित समाजाच्या विविध प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात. त्यामुळे काँग्रेसकडून राज्यात मराठा आणि ओबीसी नेतृत्वानंतर आता दलित समाजातील नेत्याच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाऊ शकते.
6 / 9
बाळासाहेब थोरात : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून तब्बल आठ वेळा निवडणूक आलेल्या बाळासाहेब थोरात यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पराभूत झाले असले तरी काँग्रेसचे अनुभव नेते असलेल्या थोरात यांचा अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे. ते यापूर्वीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे अशा अनुभवी चेहऱ्याचाही पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार केला जाऊ शकतो.
7 / 9
अमित देशमुख : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. विलासदार देशमुख यांच्याप्रमाणेच अमित देशमुख यांचीही वक्तृत्वशैली प्रभावी आहे. तसंच देशमुख यांच्या रुपाने काँग्रेसकडून मराठवाड्याला प्रतिनिधित्व देण्याचा विचार होऊ शकतो.
8 / 9
यशोमती ठाकूर : यशोमती ठाकूर यांना यंदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. इतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुरुष नेत्याच्या खांद्यावर असताना यशोमती ठाकूर यांच्यासारख्या महिला नेत्याला नेतृत्व देऊन काँग्रेस वेगळा प्रयोग केला जाऊ शकतो.
9 / 9
दरम्यान, काँग्रेसने विधिमंडळ पक्षनेतेपदावरही अद्याप कुणाची नियुक्ती केली नाही. विधिमंडळ पक्षाने याबाबत निर्णयाचे अधिकार पक्षश्रेष्ठींना दिले आहेत. पटोले यांना आता विधिमंडळ पक्षनेतेपद हवे आहे, त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केल्याचीही चर्चा रंगत आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले