शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Deepak Kesarkar: काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, तीन पक्ष, तीन पदे, अशी आहे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून चर्चेत आलेल्या दीपक केसरकर यांची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 1:00 PM

1 / 11
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर भक्कमपणे बाजू मांडल्याने सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर चर्चेत आले होते.
2 / 11
शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या दीपक केसरकर यांचा आज वाढदिवस आहे. १८ जुलै १९५५ रोजी जन्मलेल्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष, आमदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला आहे. त्यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा.
3 / 11
दीपक केसरकरांचा जन्म सावंतवाडीमधील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील वसंतराव केसरकर यांना सावंतवाडीत नगरशेठ म्हणून पदवी मिळाली होती.
4 / 11
दीपक केसरकर यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात ही काँग्रेसमधून झाली होती. १९९६ मध्ये त्यांची सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर सलग तीन वेळा त्यांनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले.
5 / 11
दरम्यान, १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर दीपक केसरकर यांना शरद पवारांना पाठिंबा जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
6 / 11
त्यानंतर २००९ मध्ये दीपक केसरकर हे सावंतवाडी-वेंगुर्ला या पुनर्रचित विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला.
7 / 11
मात्र आमदार बनल्यानंतर दीपक केसरकर आणि सिंधुदुर्गचे तत्कालिन पालकमंत्री नारायण राणे यांच्यात तीव्र मतभेद होऊ लागले. त्यातून अनेक निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीच्या लढती झाल्या.
8 / 11
अखेर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस उमेदवार आणि राणेंचे पुत्र निलेश राणे यांच्याविरोधात दीपक केसरकर यांनी उघड विरोधाची भूमिका घेतली. राणेंच्या पराभवासाठी प्रसंगी धनुष्यबाण चालवू असा पवित्रा घेत केसरकरांनी समर्थकांना राणेंविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी शरद पवार यांनी दिलेले आदेशही केसरकरांनी जुमानले नाही.
9 / 11
२०१४ च्या लोकसभेत निलेश राणेंचा पराभव झाला. त्यानंतर केसरकरांनी हातातलं राष्ट्रवादीचं घड्याळ सोडत शिवसेनेचं शिवबंधन बांधलं. तसेच ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले. तसेच फडणवीस सरकारमध्ये गृह आणि अर्थराज्यमंत्रीही बनले.
10 / 11
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत केसरकर तिसऱ्यांदा आमदार बनले. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर केसरकरांना मंत्रिपद मिळालं नाही. तसेच निर्णयप्रक्रियेमध्येही ते बाजूला पडले.
11 / 11
दरम्यान, यावर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर दीपक केसरकर शिंदे गटात दाखल झाले. तिथे त्यांनी बंडखोर आमदारांची बाजू समर्थपणे मांडल्याने त्यांच्या प्रवक्तेपदाचं कौतुक झालं.
टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना