शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BJP चा मास्टरस्ट्रोक! ठाकरेमुक्त शिवसेनेकडे वाटचाल? अशी असू शकते भाजपची रणनिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:13 PM

1 / 7
Maharashtra Politics : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. राज्याच्या राजकारणात एक आज नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यामागे भारतीय जनता पक्षाची भविष्याची रणनिती असल्याची चर्चा होत आहे.
2 / 7
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्वत: मुख्यमंत्री होण्याऐवजी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केल्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ज्या खुर्चीसाठी भाजपने शिवसेनेशी युती तोडली होती, ती खुर्ची आज समोर असूनही फडणवीसांनी त्यावर बसण्यास नकार दिला. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. पण, शिंदेंनी फक्त मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नाही, तर मातोश्री मुक्त शिवसेनेची, घराणेशाहीमुक्त राजकारणाची आणि मोदींच्या राजकीय मॉडेलची ही शपथ आहे.
3 / 7
भाजपने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करुन एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे, पण प्रत्यक्षात हे कृत्य लांब उडी मारण्यासाठी आहे. या एका निर्णयाने भाजप भविष्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. भाजपच्या या एका पाऊलात अनेक प्रश्नांची, चिंतांची आणि शक्यतांची उत्तरे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याचे अनेक अन्वयार्थ आहेत. हे समजून घेण्यासाठी फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याचा विचार करावा लागेल. ते म्हणाले- एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. शिवसेनेचे सरकार स्थापन होईल. भाजप त्याला पाठिंबा देईल. खरे तर उद्धव यांच्याशी समझोता केला असता तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री मानले जाणार आहेत. त्यांना भाजपचा पाठिंबा असेल. सरकार शिवसेनेचेच असेल. हा शिवसैनिकांसाठी मोठा संदेश आहे. त्यामुळे पक्षातील मोठा वर्ग आणि त्यांचे समर्थक शिंदे यांच्या विरोधात उभे राहण्याऐवजी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
4 / 7
शिवसेना सरकारचे नेतृत्व करणारे शिंदे केवळ पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनाच गुंतवून ठेवणार नाहीत तर शिवसेनेला पूर्ण नियंत्रणात आणण्याच्या स्थितीत असतील. येथूनच ठाकरेमुक्त शिवसेनेची सुरुवात करण्याचा महत्त्वाचा डाव खेळला जाईल. सरकार आणि संघटना या दोन्ही आघाड्यांवर ठाकरेमुक्त शिवसेना स्थापन करण्याचे काम शिंदे करतील. शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे ना शिंदे यांच्यावर सत्तेची हाव असल्याचा आरोप होणार आहे, ना भाजपवर. गेल्या वेळी भाजपने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याने आणि ज्या वेगाने देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, त्यामुळे लोकांमध्ये भाजप लोभी असल्याची प्रतिमा निर्माण झाली. उद्धव सरकारवर सातत्याने होणारे हल्लेही सत्ता मिळविण्यासाठी भाजपची अस्वस्थता असल्याचे दिसून आले. शिंदे यांना पुढे करून भाजपने मोठे मन दाखवून अशा आरोपांना पायबंद घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.
5 / 7
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचे बोलून फडणवीस यांनी पुढील रणनीतीचे महत्त्वाचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरेंचा सत्तेची इच्छा आणि तत्त्वांशी तडजोड करून खुर्ची मिळवणाऱ्या चारित्र्याचा मुद्दा बनवूनच शिंदे आणि भाजप राजकारणत करत आले. आता इथूनच शिंदे अशा निर्णयांचा आग्रह धरतील ज्यात खरे आणि ठोस हिंदुत्व दिसेल. असे निर्णय घेऊन शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणारा भाजप ठाकरे आणि जनतेसमोर हिंदुत्वाची मोठी रेषा ओढणार आहे. ठाकरेंना सत्तेवरून हटवण्यामागचा खरा हेतू खुर्चीची भूक नसून हिंदुत्वाच्या राजकारणाची पुनर्स्थापना हा होता, हे लोकांमध्ये प्रस्थापित होईल.
6 / 7
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला भाजपला पाठिंबा देणे हे खरे तर शिवसेनेचा विरोध म्हणून नव्हे तर कौटुंबिक आणि पितृसत्ताक विरोध म्हणून पाहिले जाईल. त्यामुळे वैचारिक समतेच्या आधारावर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमधील तणावही कमी होईल. भाजप शिवसेनाविरोधी नाही हे सिद्ध झाल्यावर ठाकरेंकडे भावनिक कार्डासारखी शक्यता उरणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि पक्ष ही कोणत्याही कुटुंबाची मक्तेदारी नाही, हे भाजपला सिद्द करायचे आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा भाजप आदर करतो. बाळासाहेबांच्या कुटुंबापासून फारकत घेऊनही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा पक्ष म्हणून त्यांना स्वतःला सिद्ध करायचे आहे.
7 / 7
भाजपला भविष्यातील शक्यता दिसत आहे. महाराष्ट्रात स्वबळावर उभे राहून राजकारण करण्याची आणि सत्तेत येण्याचा आराखडा भाजप आखत आहे. भाजपसाठी शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय म्हणजे अडीच वर्षांच्या राजकीय भांडणात बिघडलेली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी आणि भविष्यात मोठे यश मिळवण्याची हमी आहे. मुंबई शहरापासून महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत पहिल्यांदाच भाजप इतक्या मजबूत आणि प्रभावी स्थितीत असेल. पदावर शिंदे असले तरीदेखील रिमोट भाजपच्याच हातात असेल. येत्या काळात बऱ्याच गोष्टी कळतील...
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे