लोणावळा, दि. 22 - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळ्याजवळील कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या वेहेरगाव येथील गडावर सोमवारी (21 ऑगस्ट) संध्याकाळी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याठिकाणी कुणीही भाविक अथवा पुजारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.एकवीरा देवीच्या पुरातन मंदिरालगत डोंगर कपारीत पुजारी मंडळीची एक लहान खोली आहे. या खोलीकडे जाणार्या पायर्यांच्या तसेच समोरील जाळीवर दरड कोसळली. या घटनेत पाय-या तसेच सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांचं नुकसान झाले आहे. सुदैवाने याठिकाणी मोठी दुर्घटना टळली. असे असले तरी पावसामुळे या भागात दगड व माती ठिसूळ झाल्याने पुन्हा दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी ट्रस्टचे कार्यालय व मंदिरासमोरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. गडाची संरक्षण भिंत तसेच चार क्रमांकाच्या गेटजवळील भरावदेखील मोठ्या प्रमाणात ढासळला असल्याने एकविरा गडाचा परिसर भाविकांकरिता धोकादायक बनला आहे. मंदिराच्या वरील भागात असलेल्या डोंगरातून दरड पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविक दर्शन घेऊन ज्या भागातून बाहेर पडतात त्या ठिकाणी जाळीचे आच्छांदन करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून गडावर दरड तसेच लहान मोठे दगड पडणे, भराव व संरक्षण भिंतीचे दगड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असताना ते रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग व वन विभाग यांच्याकडून तसेच शासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने भाविकांना याठिकाणी धोका निर्माण झाला आहे.