ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 22 - शेतकरी आत्महत्यांच्या समस्या गंभीर आहेत, अशा स्थितीत उदगीरसारख्या सीमावर्ती भागात सामाजिक जाणीवेतून सुरू करण्यात आलेले हे ""शेतकरी आधार केंद्र"" कष्टकरी शेतकऱ्यांना दिलासा देईल, असा विश्वास लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला. लोकमत व लाइफ केअर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी आधार केंद्राचे उद्घाटन व शेतकरी सन्मान सोहळ्यात उद्घाटक म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा बोलत होते. यावेळी सोहळ्यामध्ये नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, लाइफ केअरच्या अध्यक्ष डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची विशेष उपस्थिती होती. शासन, प्रशासनाच्या सहकार्यातून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवता येतील. या उपक्रमासाठी अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील लाइफ केअर रुग्णालयाचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचेही राजेंद्र दर्डा यावेळी म्हणालेत.