ऑनलाइन लोकमतवसई, दि. 31 - नालासोपा-यातील एक गोदाम आणि विरारमधील पाच दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. नालासोपारा येथील साडी कम्पाऊंडमधील एका गोदामाला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सकाळी सहा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. आगीमध्ये लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे, विरार पूर्वेकडील पाच दुकानांमध्येही आग लागली होती. ही दुकाने कपडे आणि प्लास्टिक सामानांची लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सकाळी सात वाजता आग पूर्णतः आटोक्यात आली. मात्र या दुर्घटनेतही दुकानातील लाखो रुपयांच्या सामानाची राख झाली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.