ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. ९ : काठोकाठ खळाळणारी नदी ही त्या गावची श्रीमंती मानली जाते. गोदावरी नदीमुळे नाशिकक्षेत्री सुबत्ता आली आणि तीर्थस्थानामुळे ती वाढली. मात्र, बुजुर्गांना ज्ञात असलेल्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर गोदामाई पहिल्यांदाच कोरडीठाक पडल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. दर पावसाळ्यात दुतोंड्या मारुतीच्या छातीला भिडून दुथडी भरून वाहणारी गोदामाई यंदाही नक्कीच खळाळून वाहील आणि पुन्हा एकदा गोदाकाठ चैतन्याने बहरून येईल, अशी अपेक्षा तमाम नाशिककर व्यक्त करताना दिसून येत आहेत.मागील वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडून गंगापूर धरण ७० टक्क्याच्या आसपास भरले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार समान पाणीवाटपाचे धोरण राबविताना गंगापूरचा भरलेला घडा पालथा करण्याचे ‘राजकारण’ नाशिककरांनी अनुभवले. त्यानंतर, गेल्या सात महिन्यांपासून गोदावरी प्रवाहित असल्याचा आनंद घेता आलेला नाही. सद्यस्थितीत संपूर्ण गोदापात्र कोरडेठाक पडले असून, बाहेरून येणाऱ्या भाविक-पर्यटकांच्याही मुखातून ‘ऐसी गोदा कभी देखी नहीं’, असे सहजोद्गार बाहेर पडताना दिसून येत आहे. ऐन सिंहस्थ कुंभमेळा काळात गोदावरी पात्र कोरडेठाक झाल्याचे दुर्दैव वाट्याला आले आहे.गोदामाई कोरडी पडल्याने सिंहस्थवर्षानिमित्त स्नानासाठी येणाऱ्यांचा हिरमोड तर होतो आहेच शिवाय, दशक्रिया विधीप्रसंगी अस्थीविसर्जनालाही पाण्याचा मागमूस दिसत नसल्याने धार्मिक विधीवरही गंडांतर आले आहे. रामवाडी परिसरातील गोदाकाठी तर शुष्क भेगाळलेले पात्र भयावह स्थिती निदर्शनास आणून देते.उन्हाळ्यात गोदावरी घाटावर सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांना आता कोरड्या पात्राचे विदारक दर्शन घडत आहे. महापुराच्या वेळी गोदावरीत सचैल न्हाऊन निघणारा दुतोंड्याही कोरड्याठाक पडलेल्या पात्राकडे विषण्ण नजरेने पाहतो आहे. नाशिककरांबरोबर आता त्यालाही आस लागली आहे,भरभरून खळाळून वाहणाऱ्या गोदामाईची. त्यामुळेच कुणी गंगापूजन करते आहे, तर कुणी पर्जन्ययाग करत वरुणराजाला साकडे घालताना दिसून येत आहे. आभाळात गोळा होणाऱ्या नभाने पखवाज वाजवावा आणि भरभरून बरसणाऱ्या जलधारांनी आमची गोदामाई दुथडी भरून वाहावी, अशीच प्रार्थना सारे नाशिककर श्रीरामाला करत आहेत.