शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांचा भाजप सोडण्याचा निर्णय पक्का झाला?; या ३ घटनांमधून मिळाले स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 1:56 PM

1 / 10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आघाडी आणि युतीच्या बदललेल्या समीकरणांमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता मावळलेल्या नेत्यांच्या पक्षांतरांनीही जोर पकडला आहे.
2 / 10
मागील काही दिवसांपासून महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांतील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये जाण्यासाठी रांग लावली आहे. काही नेत्यांचा पक्षप्रवेश झाला असून अन्य काही नेते वेटिंगवर असल्याचं दिसत आहे.
3 / 10
पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून प्रयत्न केले जात असून इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सतत संवाद साधला जात आहे.
4 / 10
समरजीत घाटगेंनंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील, अतुल भोसले, विवेक कोल्हे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील काही आजी-माजी आमदारांनाही पवारांकडून संपर्क साधला जात आहे.
5 / 10
इंदापूरची जागा महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. कारण इंदापूरचे विद्यमान आमदार असलेले दत्तामामा भरणे हे यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांची साथ दिली असून ते निवडणुकीच्या सध्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचंही दिसत आहे. त्यामुळे इंदापूरचं अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
6 / 10
हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचे काही स्पष्ट संकेतही मागील काही दिवसांत मिळाले असून तीन घटनांमध्ये त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे.
7 / 10
१. शरद पवारांची भेट अन् बंद दाराआड चर्चा : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र ही बैठक संपल्यानंतर पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली. शरद पवार यांचा सर्वपक्षीय नेत्यांशी कायम संपर्क असतो. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसंच आपल्या पक्षांतराबाबत चर्चा सुरू असताना पवार यांना भेटल्याचे काय परिणाम होणार आहेत, याची हर्षवर्धन पाटील यांनाही कल्पना नक्कीच असणार. मात्र तरीही पाटील यांनी शरद पवारांची भेट न टाळल्याने ते वेगळा राजकीय निर्णय घेण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचं दिसत आहे.
8 / 10
२. भाजप नेतृत्वाबद्दल व्यक्त केली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाराजी: हर्षवर्धन पाटील हे मागील काही दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्या आणि वेबपोर्टल्सना मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमधून ते आपल्या मनातील खदखदही जाहीरपणे व्यक्त करत आहेत. मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पक्षाने आपल्या अनुभवाचा फायदा करून घेतला नाही किंवा अनेकवेळा चर्चा होऊनही विधानपरिषद किंवा राज्यसभेसाठी माझ्या नावाचा विचार केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
9 / 10
३. कार्यकर्त्यांकडूनही तुतारी हाती घेण्याबाबत उघडपणे भाष्य: हर्षवर्धन पाटील यांच्या कारकीर्दीची सुरुवात १९९५ साली अपक्ष म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी इंदापुरातील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुका लढवून विजय मिळवला होता. तसंच मागील निवडणुकीत ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे गेले होते. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे पक्ष कोणताही असो, हर्षवर्धन पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग इंदापूर मतदारसंघात असल्याचं स्पष्ट होतं. हर्षवर्धन भाऊंनी अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घ्यावा, असं काही दिवसांपर्यंत त्यांच कार्यकर्ते म्हणत होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर व्यासपीठांवर आणि माध्यमांच्या कार्यकर्त्यांसमोरही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 'तुतारी'बाबतचा आग्रह होईल लागल्याने पाटील यांनीच पक्षांतराची तयारी केल्याने त्याचे प्रतिबिंब कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे का, अशी चर्चा इंदापूरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
10 / 10
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अद्याप तरी पक्षांतराबाबत थेट भाष्य करण्यात आलं नसलं तरी वेगळा निर्णय घेण्याबाबत कार्यकर्ते आग्रही असल्याचं ते सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाटील यांची राजकीय दिशा नक्की कशी असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा