मुंबई, दि. 30 - मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. यामुळे मुंबईकरांसह मुंबईबाहेरुन आलेल्या नागरिकांचीही पुरती दाणादाण उडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती तर पाण्यात गेलेल्या मुंबईनं पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलैच्या आठवणीनं धडकी भरली होती. मात्र, भर पावसातही माणुसकीला पूर आल्याचे यावेळी पाहायला मिळाले. प्रशासनासहीत सर्वसामान्य मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत मुंबई स्पिरीटचे दर्शन घडवलं. मुंबई पोलिसांनीही वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेरुन मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना मदत केली. कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यात संपूर्ण दिवस उभे राहून मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मध्य प्रदेशातील शरवैया कुटुंबीयांना मुंबई पोलिसांमुळे मिळाला आसरामध्य प्रदेशातून शरवैया कुटुंबीय त्यांच्या 7 वर्षीय मुलीला घेऊन बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. शैलेंद्र शरवैया (वय 32), मनिषा शरवैया (वय 34), सखेश पटेल (वय 34) आणि नेहा शरवैया (वय 7) हे सर्वजण मध्य प्रदेशातून मुंबईत आले होते. वैद्यकीय उपचार झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प असल्यानं शरवैया कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे ट्विटरद्वारे मदत मागितली. यावेळी पोलिसांनी तात्काळ त्यांना मदत करुन मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात शरवैया कुटुंबीयांची संपूर्ण व्यवस्था केली.तसंच धुळे जिल्ह्यातून आझाद मैदानावर मोर्चासाठी आलेल्या काही महिलादेखील मुसळधार पावसामुळे अडकल्या होत्या. पूजा थोरात, वर्षा शिरसाट, नीता भालेराव, शीतल थोरात, माधुरी परदेशी, सविता निकम, विजया क्षीरसागर,भावना सोनावणे, प्रीती कोळी, आम्रपाली बागुल, जयश्री पाटील या सर्व नर्स महिला आझाद मैदान येथे मंगळवारी दाखल झाल्या होत्या. अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा पूर्ण बंद असल्याने त्यांनी 100 नंबरवर संपर्क साधला असता त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळाली. या महिलांचीही पोलीस आयुक्त मुंबई कार्यालयात योग्य ती व्यवस्था करण्यात आली.मुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावरछत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी रात्रीपासून मुंबईकरांना अल्पोपहार व जेवण पुरवण्याचे काम नौदलातर्फे सुरू आहे. दुपारीही आणखी 700 लोकांसाठी पुरेल इतके अन्नाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कमांडर अनिरुद्ध मेहता यांनी लोकमतला दिली. घाटकोपर रेल्वे स्टेशन सीएसटी स्थानकावर प्रवाशांचा मुक्काममुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी लोकलची वाट पाहत आहेत. मंगळवारी रात्रीपासून ठप्प असलेली लोकल सेवा अद्याप येथून सुरू झालेली नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू होईपर्यंत फलाटावरच मुक्काम करण्याच्या विचारात प्रवासी दिसत आहेत. मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दादर, ठाणे, कल्याण या मुख्य स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव पुढील लोकल कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, लोकलच्या प्रवाशांमुळे एक्स्प्रेस गाड्यांमध्येही प्रचंड गर्दी झाली आहे. माहीम परिसरात टॅक्सीवर कोसळले झाड