मुंबई, दि.15 - राज्यासहीत देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त सीवूड ते बेलापूर -नवी मुंबई मनपाकार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली. नाशिक : वडाळा गाव येथे जामा गौसिया मशिदीसमोरही स्वातंत्र्यदिन उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला. मशिदीचे मुख्य इमाम धर्मगुरु मौलाना जुनेद आलम यांनी ध्वजारोहण केले. तर मदरसा गौसिया फैझान -ए-मदारमधील विदयार्थ्यांनी राष्ट्रीयध्वजाला सलामी दिली. यावेळी देशाच्या एकता, प्रगती आणि संरक्षणासाठी सामूहिक दुवा करण्यात आली.नाशिकरोड विभागीय कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले. दरम्यान यावेळी समृद्धीविरोधी कृती समितीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न करता शेतक-यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची मागणी केली होती. शिवाय, महाजन यांना रोखण्यात येणार असल्याने आंदोलकांना सोमवारी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली होती आणि ध्वजारोहण कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.