भरधाव बसची इनोव्हा आणि स्विफ्ट गाड्यांना धडक बसली आणि बस २० फूट खोल दरीत कोसळली. त्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर सुरू झाले मृत्यूचे तांडव. तब्बल १७ जणांना यात आपला जीव गमवावा लागला आणि ४७ जण जखमी झाले. वृत्त समजताच आप्तांनी आणि परिचितांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यांच्या आक्रोशामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. मदतकार्यात शीघ्र कृती व्हॅनने महत्त्वाची भूमिका बजावली. जखमींना तातडीने परिसरातील रुग्णालयांत दाखल करण्यात आले.घणसोलीतील तरुणांवरील काळप्रसंग टळलासूर्यकांत वाघमारे , नवी मुंबईमहामार्गावर अनोळखी व्यक्तींना मदत करण्यासाठी थांबलेले घणसोलीतील सहा तरुण काळप्रसंगातून थोडक्यात वाचले. टायर फुटल्याने मार्गावर उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमधील व्यक्तींना ते मदत करत होते. तेव्हाच पाठीमागून आलेल्या खासगी ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यानंतर डावीकडे वळलेल्या बसने मदतीसाठी थांबलेल्या तरुणांच्या इनोव्हा कारला धडक दिली. यामध्ये बससोबत कार सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली.मुंबई-पुणे महामार्गावर शिवकर येथे झालेल्या अपघातामध्ये घणसोली गावातील सहा तरुणांचे प्राण बचावल्यामुळे घणसोलीकरांवरील शोकप्रसंग थोडक्यात टळला आहे. हे सहा जण शनिवारी लोणावळा येथे एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी सर्वांना घरगुती कामे असल्यामुळे मध्यरात्री ३च्या सुमारास ते महामार्गाने नवी मुंबईच्या दिशेने निघाले होते. पहाटे ४.३०ला त्यांची इनोव्हा कार शिवकर गावालगत आली असता समोर एक स्विफ्ट कार उजव्या लेनवर उभी असल्याचे चालक आशिष पाटीलच्या निदर्शनास आले. त्यामुळे लेन बदलून ते पुढे जात असतानाच स्विफ्टजवळील एक महिला व पुरुष मदतीसाठी हातवारे करत असल्याचे त्यांनी पाहिले. रामनाथ म्हात्रे यांनी त्यांच्या मदतीसाठी कार थांबविण्याचे मित्रांना सुचवले. त्यामुळे काही अंतरावर डाव्या बाजूला त्यांनी कार उभी केली. या वेळी सागर पाटील व विपीन म्हात्रे कारमध्ये मागच्या सीटवर झोपले होते. तर इनोव्हा चालक आशिष पाटील, रामनाथ म्हात्रे, सुशील म्हात्रे व दीपेश म्हात्रे हे बंद पडलेल्या स्विफ्टमधील व्यक्तींच्या मदतीसाठी गेले.या वेळी उभ्या असलेल्या स्विफ्टचा पुढचा टायर पूर्णपणे फाटलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे ते चौघे जण कारचा टायर बदलण्यास मदत करत होते. त्याचवेळी मागून निखिल ट्रॅव्हल्सची बस भरधाव वेगात त्यांच्या दिशेने येत असल्याचे रामनाथ यांनी पाहिले. परंतु काही सुचण्यापूर्वीच बसने स्विफ्ट कारला धडक दिली. त्यानंतर ही बस डावीकडे वळून काही अंतरावर मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या इनोव्हाला धडकली. अपघातात महामार्गाचा सुरक्षा कठडा तोडून बस व इनोव्हा सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली. अपघातावेळी इनोव्हामध्ये सागर व विपीन झोपलेले होते, तर बसच्या धडकेने स्विफ्ट जागीच फिरल्यामुळे रामनाथ व त्यांच्या साथीदारांनाही दुखापत झाली. या स्थितीतही त्यांनी इनोव्हामध्ये अडकलेल्या सागर व विपीन यांची सुटका केली. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नव्हती. याचदरम्यान महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने त्यांच्यासह बसमधील जखमींना तत्काळ मदत मिळू शकली. शिवाय बसचा मागचा भाग झाडात अडकल्यामुळे ती पूर्णपणे खड्ड्यात कोसळण्याचे टळून अनेकांचे प्राण वाचू शकले.साताऱ्यावरून ११ वाजता जोगेश्वरीकडे येण्याकरिता निखिल ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसलो. पहाटे मोठा आवाज झाला आणि बस दरीत कोसळली. दरम्यान मी पुढच्या सीटवर आदळलो. पाय सिटच्या खाली अडकला होता. पण तो कसाबसा काढून खिडकीतून बाहेर आलो. अपघात कसा झाला ते समजलेचनाही.- हितेश चव्हाणसातारा येथून आम्ही मुंबईला निघालो होतो. माझ्या पत्नीची वांद्रे येथे १०.३०ला जजची परीक्षा होती. त्यामुळे ती, मी आणि आमचा लहान मुलगा आलो होतो. झोपेत असताना बसने पलटी मारली त्यामुळे माझे डोके पुढच्या सीटवर आदळले आणि मी बेशुद्ध झालो. शुद्धीवर आल्यानंतर खिडकीची काच फोडली आणि स्वत: बाहेर आलो. त्यानंतर इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासही मदत केली. अपघातामुळे पत्नी सुनीताला परीक्षा देता आली नाही. आमच्याबरोबर मुलगाही जखमी झाला.- तानाजी दिघेमी, आई-वडील आणि अडीच वर्षांची मुलगी वेदिका या बसने गावावरून परत येत होतो. अपघात झाला आणि डोके पुढच्या सीटवर आदळले. पाण्याची लाट यावी तशा पाठीमागच्या सीट पुढे सरकत गेल्या. त्यातून माझ्या मांडीवर असलेली अडीच वर्षांची वेदिका हातातून निसटली आणि कुठे जाऊन पडली ते समजलेच नाही. माझी चिमकुली क्षणात मला सोडून गेली. वडील काशिनाथ निकम यांचेही निधन झाले.- निशा यादव हट्ट केला नसता तर...कांदिवली पूर्वेकडील भोईसर परिसरात चंद्रभागा या कुटुंबीयांसोबत राहत. ३१ मे रोजी सातारा येथे पुतण्याचे लग्न असल्याने त्या मुलगी अश्विनी भोईटे आणि नात निर्मयीसोबत गेल्या होत्या. लग्नानंतर चंद्रभागा लगेचच घरी परतणार होत्या. मात्र नातेवाइकांसोबत आणखी काही दिवस घालविण्यासाठी त्यांनी मुलीकडे हट्ट केला. आईच्या आग्रहाखातर अश्विनीनेही राहण्यास होकार दिला. रविवारी सर्वांचा निरोप घेत अश्विनी आईसोबत घरी निघाली. मात्र वाटेत काळाने घाला घातला. दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ६च्या सुमारास अश्विनीने कसेबसे स्वत:ला सावरत कल्याण येथे राहत असलेले पती योगेश भोईट यांना कॉल करून घटनेची माहिती दिली.आम्हा सर्वांना रुग्णालयात नेत असल्याचे तिने त्यांना सांगितले. त्यानुसार योगेशनेही पत्नी, मुलीसह सासूचा शोध घेण्यास सुरुवात केली. पत्नी आणि मुलगी सापडली; मात्र सासूचा या अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांना समजले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच जणू निसटल्याचे योगेश यांनी सांगितले. ‘हसऱ्या आणि मनमिळावू स्वभावाने त्या सर्वांच्याच फार जवळच्या होत्या. माझ्यावर नेहमीच त्यांनी जावयापेक्षा स्वत:चा मुलगा म्हणून प्रेम केले,’ असे योगेश यांनी सांगितले. उगाच त्यांनी राहण्याचा आग्रह धरला, असे वाटत असल्याचे योगेश म्हणाले.