नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील सुमारे साडे पाच हजार फूट उंचीचे महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड या पुरस्काराने अदिबाला गौरविण्यात आले आहे. तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीही स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन तिचा सन्मान केला.नाशिकमधील लिटर किंग्डम या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सिनियर केजीमध्ये शिकणारी अदिबा आरिफ खान या विद्यार्थिनीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला ४०गिर्यारोहकांच्या समुहासोबत सर केले होते. त्यानिमित्त नुकतेच आंध्रप्रदेशमधील विशाखापटट्णमच्या विविध विश्वविक्रमांची नोंद करणाºया ‘वज्र वर्ल्ड रिकॉर्ड’ या संस्थेनेही अदिबाला पुरस्काराने सन्मानित केले आहे.भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र नाशिक व मार्क मार्शल आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहणाचे आयोजन २६ जानेवारी रोजी कळसुबाई शिखरावर केले होते. यावेळी अदिबाही ४०गिर्यारोहकांसोबत सहभागी झाली होती. दरम्यान, अदिबाने कोणाचीही मदत न घेता केवळ गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली तीन तासांमध्ये कळसुबाई शिखराची चढाई पूर्ण करत तिरंग्याला सलामी दिली होती. अदिबाला गिर्यारोहणाची आवड लहानवयातच असल्यामुळे आणि याबाबत तिला अभिरुचीही असल्यामुळे तीने सराव कायम ठेवल्यास ती भविष्यात एक उत्कृष्ट महिला गिर्यारोहक म्हणून देशाचे नाव उज्ज्वल करु शकते, असा विश्वास तीच्यासोबत असलेल्या गिर्यारोहकांनी व्यक्त केला आहे. कळसुबाई चढत असताना अदिबाची जिद्द ही कमालीची होती. तिने ठरविलेले ध्येय पूर्ण केले.