ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - मराठा आरक्षणासहीत विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चानं आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईसह राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली असून यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण चक्का जाम आंदोलन शांततेत होईल, असे प्रतिनिधींनी स्पष्ट केले. कोणताही प्रतिनिधी किंवा कार्यकर्ता कायदा हातात घेणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे. यापूर्वी मराठी क्रांती मोर्चातर्फे राज्यभरात मूक मोर्चे काढण्यात आले होते. राज्य सरकारला इशारासरकार वेगवेगळी कारणं देत असून मराठा समाजाचे आरक्षण आणि कोपर्डी घटनेसह अन्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार याबाबत गंभीर दिसत नाही आहे. तरीही मराठा क्रांती मोर्चा मूकपणे आंदोलन करत आहे. मोर्चानंतर आता रास्ता रोको आंदोलनही शांततेच्या मार्गाने होत आहे. सरकारला इतर राज्यांप्रमाणे हिंसक आंदोलन हवे आहे का? असा इशाराही आंदोलनाचे प्रतिनिधी वीरेंद्र पवार यांनी दिला आहे.दादर चक्का जाम आंदोलनामुळे लालबाग-दादरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान दादरमधील आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भांडूप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ रास्ता रोकोचा प्रयत्न फसला, पोलिसांनी 70 कार्यकर्त्याना घेतले ताब्यातदहिसर दहिसर चेकनाक्यावर मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, जय जिजाऊ, जय शिवाजी', अशी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. दहिसर चेक नाका जाम केल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाणे : चक्का जाम आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांचे हाल अर्ध्या तासांच्या चक्का जाम आंदोलनामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग जाम औरंगाबाद शहरात 9 ठिकाणी चक्का जाम आंदोलन, वाळूज परिसरातील तिरंगा चौकात पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार, कार्यकर्त्यांची धरपकड सुरूसांगली - पुणे बंगळुरू महामार्गावर वाघवाडी फाटा येथे चक्काजामपनवेलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असे असेल आंदोलन- मराठा क्रांती मूक मोर्चांप्रमाणेच चक्का जाम आंदोलनावेळी कोणतीही घोषणाबाजी होणार नाही. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण मार्गानेच होईल.- शासकीय गाड्यांची तोडफोड करू नये. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्यांना रस्ता करून द्यावा, असे आयोजकांनी म्हटले आहे.- समाजकंटकांकडून गैरफायदा घेतला जाऊ नये, म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणांशिवाय कोणत्याही ठिकाणी चक्का जाम आंदोलन होणार नाही.- आंदोलनादरम्यान कोणतीही तोडफोड किंवा जाळपोळ तसेच वाहनांची हवा सोडण्याचे प्रकार होणार नाहीत.- कारवाईदरम्यान पोलिसांना सहकार्य केले जाईल. पोलिसांवर कोणताही कार्यकर्ता हात उचलणार नाही किंवा गैरवर्तन करणार नाही, असे आयोजकांनी म्हटले आहे.