राजू काळे, ऑनलाइन लोकमत भाईंदर, दि. २२ - उत्तन-भाटेबंदर येथील वेलंकनी माता मंदिरामागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आतील खडकावर एक प्रेमी युगुल सोमवारी सकाळी ११.३० वा भरतीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. ही बाब तेथे फेरफटका मारणारे स्थानिक मच्छीमार शॉन कोलासो यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी वेलेरिन पन्ड्रिक व अजित गंडोली यांच्या मदतीने त्या युगुलाला सुखरूप किनाऱ्यावर आणले. यामुळे पुढील दुर्घटना टळली. बोरिवली पूर्वेस राहणारी स्वप्नाली (२५) व सूरज (२२) हे सोमवारी सकाळी ११ वा येथे फिरण्यास आले होते. अर्ध्या तासाने ते किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आतील खडकावर जाऊन बसले. काही वेळाने समुद्राला भरती आल्याने खडकाजवळील पाण्याची पातळी वाढली. ते किनाऱ्यावर जाण्यास निघाले. सुरुवातीला सुरज पाण्यात उतरला. पाणी त्याच्या छाती पर्यंत पोहोचल्याने ते दोघे घाबरून पुन्हा खडकावर जाऊन बसले. ही बाब किनाऱ्यावर फेरफटका मारीत असलेले स्थानिक मच्छीमार कोलासो यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच परिसरातील इतर मच्छीमारांना घटनेची माहिती दिली. शॉन यांनी त्वरित तेथे धाव घेतलेल्या मच्छीमारांपैकी वेलेरिन व अजित यांच्या मदतीने युगुलाला किनाऱ्यावर सुखरूप आणले. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविणाऱ्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे त्या युगुलाला पुन्हा तसे न करण्याची समज दिली. वेलेरिन हे स्थानिक काँग्रेसचे ब्लॉक एकचे अध्यक्ष तर अजित हे नगरसेविका शर्मिला पती आहेत.