शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवार-काँग्रेस इतक्या जागा लढविणार, महायुतीचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 2:41 PM

1 / 11
लोकसभा निवडणुकीच्या अपयशाला महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपा अजित पवार गटाला दोषी ठरवत आहे. यामुळे तिन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अजित पवारांची घोटाळ्यांच्या प्रतिमेमुळे शिंदे शिवसेनेला आणि भाजपाच्या उमेदवारांना फटका बसला, मतदार दूर गेला असा ठपका राष्ट्रवादीवर ठेवला जात आहे.
2 / 11
दुसरीकडे अजित पवार बारामतीचे मतदान झाल्यानंतर कुठेच प्रकाशझोतात आलेले नाहीत. यामुळे येती विधानसभा तिन्ही पक्ष एकत्र लढतील का की शिवसेना भाजपाला अजित पवारांना बाजुला करायचे आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच तिकडे मविआमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरल्याचे वृत्त आहे.
3 / 11
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. लोकसभेच्या ४८ जागा होत्या. महायुतीपेक्षा मविआने तेव्हा लवकर जागावाटप केल्याने त्याच्या फायदा मविआला झाला होता. शिवसेनेच्या रामदास कदमांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यात ही खंत बोलून दाखवत विधानसभेला तरी भाजपाने आमचे लवकर उमेदवार ठरवावेत अशी मागणी केली होती. महायुतीतील सध्याचे वादळ पाहता त्यांच्या जागा एवढ्यात तरी वाटून होतील असे वाटत नाहीय.
4 / 11
इकडे उद्धव ठकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बऱ्यापैकी आघाडी घेतल्याचे समजते आहे. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच तिन्ही पक्ष समसमान जागा वाटून घेणार आहेत. म्हणजेच प्रत्येक पक्ष ९६-९६-९६ अशा जागा वाटून घेण्यावर सहमत झाल्याचे वृत्त दी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
5 / 11
उच्चपदस्थ सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. सध्यातरी महाविकास आघाडीत कोणी चौथा भिडू नाहीय. लोकसभेला राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकरांचा वंचित आणि रासपचे महादेव जानकर यांच्याशी चर्चा सुरु होती. सुरुवातीला जानकरांनी मविआसोबत बोलणी केली आणि नंतर भाजपाची ऑफर आल्यावर तिकडे उडी मारली होती.
6 / 11
त्यानंतर राजू शेट्टी यांनी बोलणी फिस्कटल्याने वेगळे लढण्याची घोषणा केली. वंचितने अव्वाच्या सव्वा जागांची मागणी केल्याने मविआने भाव दिला नाही आणि आंबेडकरांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केले होते. यामुळे लोकसभेच्या ४८ जागांवर फक्त तीनच पक्षांनी उमेदवार दिले होते. याचा फायदा या आघाडीला झाला होता. आताही विधानसभेला चित्र स्पष्ट झालेले असून वंचित काही मविआसोबत जाणार नसल्याची चिन्हे आहेत.
7 / 11
मविआमध्ये तिन्ही पक्षांनी कोणी मोठा भाऊ, कोणी छोटा भाऊ असे मानायचे नाही असे ठरविले आहे. सर्व पक्ष समान असून सर्वांनी समान जागा लढवाव्यात असे ठरल्याचे या सुत्रांनी म्हटले आहे. तसेच ज्या पक्षांशी या तीन महत्वाच्या पक्षांची मैत्री आहे त्यांनी त्यांच्या साठी आपापल्या वाट्याला आलेल्या जागा सोडाव्यात असेही ठरल्याचे समजते आहे.
8 / 11
कोणी किती जागा वाटून घ्यायच्या हे ठरविण्यासाठी एकच बैठक घेण्यात आली आहे. यापुढच्या बैठका या कोण कुठून लढणार, कोणाला कुठला मतदारसंघ हवा आहे हे ठरविण्यासाठी होणार असल्याचे सूत्र शरद पवारांनी मांडल्याचे या नेत्यांनी सांगितले आहे.
9 / 11
काँग्रेसच्या नाना पटोलेंनी काँग्रेसचे १४ खासदार निवडून आले आहेत. यामुळे आम्हाला जागा जास्त मिळायला हव्यात असे म्हटले आहे. तसेच आघाडीसाठी काही जागांवर तडजोड करण्याची तयारी पटोले यांनी दर्शविली आहे. तर राऊत यांनी काँग्रेस आणि पवार राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी उद्धव ठाकरेंना स्टार कॅम्पेनर म्हणून कोणी डावलू शकत नाही असा युक्तीवाद केला होता. आणि ज्या काही जागा जिंकल्या त्या तिघांनी एकत्र जिंकल्या आहेत. यामुळे तिघांनाही एकमेकांची मते मिळालेली आहेत, याचा विचार करून जागावाटप करावे असे म्हटले होते.
10 / 11
लोकसभेच्या निकालांवरून महायुतीत तिन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका सुरु केली आहे. शिवसेना भाजपवर टीका करत आहे, याचबरोबर राष्ट्रवादीलाही कोसत आहे. तर राष्ट्रवादी शिवसेनेला प्रत्यूत्तर देताना भाजपवरही निशाना साधत आहे. भाजपच या दोघांना एकत्र आणणारा असला तरी केंद्रात तिकडे मोदींना अडचण झाल्याने त्यांनाही अजित पवार ही अडचणीचे वाटत आहेत.
11 / 11
भाजपाला १५० जागा लढवायच्या आहेत. तर उरलेल्या १३८ जागा या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विभागल्या जातील. परंतू, या दोघांनाही ९० ते १०० जागा हव्या आहेत. यामुळे या तिघांचा तिढा असाच सुरु राहिला तर अजित पवार गट बाहेर पडण्याची चाचपणी करण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीय. तसेच हा तिढा सोडविला नाही तर लोकसभेसारखाच फटका विधानसभेलाही बसण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस