शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 3:18 PM

1 / 10
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे बंडखोरांना रोखणं महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यासमोरील आव्हान आहे. त्यातच काही मतदारसंघात उमेदवारांची संख्या पाहून निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली आहे. जर उमेदवारांनी माघार घेतली नाही तर मतदारांना उमेदवार आणि चिन्ह शोधणे कठीण जाणार आहे.
2 / 10
राज्यातील २८८ जागांवर एकूण ७ हजार ९९५ उमेदवारांनी अर्ज भरलेत. त्यात ३९ विधानसभा जागा अशा आहेत जिथे ५० हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक उमेदवारांची संख्या नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात आहे. जिथं निवडणूक आयोगला कमीत कमी ९ ईव्हीएम मशिन लावण्याची गरज भासेल. अशीच परिस्थिती बीड आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघात झाली आहे.
3 / 10
भोकर मतदारसंघात जवळपास १६९ उमेदवारांनी अर्ज भरलेत. निवडणुकीत उमेदवारांची गर्दी पाहता निवडणूक सुधारणांबाबत चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये आणि एससी-एसटी उमेदवारांना त्यांच्या उमेदवारीसह ५ हजार रुपये जमा करावे लागतात.
4 / 10
मात्र तरीही अनेक असे उमेदवार जे गांभीर्याने निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरत नाहीत तर फक्त उमेदवारी अर्ज भरतात. गांभीर्याने निवडणूक न लढविणाऱ्यांमुळे अनेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात १६७ उमेदवारांनी अर्ज दाखल झालेत.
5 / 10
विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर १६७ पैकी ११० उमेदवार रिंगणात राहिलेत. नावे मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर आहे.
6 / 10
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, उर्वरित उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास भोकरच्या प्रत्येक बूथवर ९ ईव्हीएमची आवश्यकता असेल. निवडणूक आयोग ईव्हीएम बसवण्याच्या तयारीत आहे, अंतिम निर्णय ४ नोव्हेंबरनंतरच घेतला जाईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील निजामाबाद मतदारसंघातून १८५ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, हा एक विक्रम आहे.
7 / 10
राज्यातील भोकर मतदारसंघ व्यतिरिक्त बीड विधानसभा आणि औरंगाबाद पूर्व विधानसभेतही उमेदवारांची भाऊगर्दी आहे. बीडमध्ये १३९ जणांनी अर्ज दाखल केले, त्यापैकी १३ अर्ज फेटाळण्यात आले. औरंगाबाद पूर्वमध्येही ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यापैकी १३ अर्ज फेटाळण्यात आले.
8 / 10
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा संसदेत मांडला होता. अनेक उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला ब्लॅकमेल करून आपली ताकद दाखवण्यासाठी अर्ज भरतात असा आरोप त्यांनी केला. त्यांचा उद्देश पूर्ण झाल्यावर ते परत घेतात. हाय प्रोफाईल जागांवर आपले नाव चमकवण्यासाठी लोक स्वतःची उमेदवारी दाखल करतात असं त्यांनी सांगितले होते.
9 / 10
उमेदवारांच्या या भाऊगर्दीत राज्यातील कोकण विभागातील कणकवली विधानसभा असा मतदारसंघही आहे, जिथे केवळ नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मलबार हिलमध्ये केवळ ११ आणि रत्नागिरी मतदारसंघात १२ जणांनी अर्ज दाखल केले.
10 / 10
आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी ७९९५ उमेदवारांनी १०९०० उमेदवारी अर्ज भरले आहेत. छाननी दरम्यान ९२०९ फॉर्म स्वीकारण्यात आले तर १,६४० तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आले. अनेकदा उमेदवार स्वत:च्या नावाचे ३-४ अर्ज भरत असतो.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhokar-acभोकरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024EVM Machineईव्हीएम मशीन