निकालापूर्वीच मित्रपक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या ३ जागा धोक्यात; मविआत चाललंय काय? By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 2:57 PM
1 / 10 विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यापासून महाविकास आघाडीत जागावाटपाचा बराच गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर राज्यात काँग्रेस १०१, ठाकरेसेना ९४ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ८८ जागांवर निवडणूक लढवत आहे. परंतु काही मतदारसंघात मविआचे २ उमेदवार त्यासोबत बंडखोरांच्या बॅनरवर नेत्यांचे फोटो यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 2 / 10 उद्धव ठाकरेंकडून राज्यात ९४ जागा लढवण्यात येत आहेत. त्यातील ३ जागा मित्रपक्षाकडूनच धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर आणि नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी उभ्या केलेल्या उमेदवाराविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रचारात उघडपणे दिसतात. 3 / 10 महाविकास आघाडीकडून रामटेक मतदारसंघात विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध करत बंडखोरी केली आहे. रामटेक मतदारसंघात काँग्रेस नेते उघडपणे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. 4 / 10 बंडखोर राजेंद्र मुळक यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतरही पक्षाचे खासदार श्यामकुमार बर्वे, नेते सुनील केदार आणि इतर पदाधिकारी मुळक यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. तर ज्या मुळक यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली त्यांचा फोटो शेजारील मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बॅनरवर दिसून येतो. 5 / 10 नांदेड उत्तर मतदारसंघात हीच परिस्थिती आहे. या मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. तिथे ठाकरेंच्या उमेदवार संगीता डक यांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेत्यांचा आदेश असला तरी कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजली आहे. पक्षाच्या २ जिल्हाप्रमुखांनी या नाराजीतून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडेही पाठ फिरवली. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवार संगीता डक एकाकी पडल्या आहेत. 6 / 10 नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. अब्दुल सत्तार यांच्या बॅनरवर ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचं दिसून येते. त्यात शरद पवारांनीही नांदेड उत्तर मतदारसंघात आम्ही काँग्रेसचे उमेदवार सत्तार यांच्या पाठीशी असून इतर कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नाही अशी भूमिका घेतली आहे. अब्दुल सत्तार यांच्या प्रचारसभेत बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसून येतो. 7 / 10 सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघावरून मविआत वाद झाला. या मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाने दावा केला. याठिकाणी शेकापने बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा करत अजित पवारांच्या पक्षातून आलेल्या दीपक आबा साळुंखेंना उमेदवारी दिली आहे. 8 / 10 सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण शेकाप आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या बॅनरवर काँग्रेस - राष्ट्रवादी नेत्यांचे फोटो आहेत. शरद पवार, सुशील कुमार शिंदे यांचा फोटो शेकाप उमेदवाराच्या प्रचारात दिसून येतात. तसेच ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारतही शरद पवारांचा फोटो आढळतो. 9 / 10 गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला. मात्र ही जागा सोडण्यास काँग्रेस तयार नव्हते. तरीही ठाकरेंच्या आग्रहानंतर ही जागा काँग्रेसने सोडली. परंतु तिथे काँग्रेस उमेदवाराने बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारामागे काँग्रेसने ताकद उभी केली. निवडणुकीच्या निकालात अपक्ष उमेदवाराचा विजय झाला तर ठाकरेंचा उमेदवार पडला त्यामुळे सांगली पॅटर्न राज्यात चर्चेत आला. विधानसभेला हाच सांगली पॅटर्न राबवला जातोय का अशी चर्चा आहे. 10 / 10 दरम्यान, विधानसभेतील जागावाटपावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. मित्रपक्षाने आपला आकडा वाढवण्याच्या नादात जे उमेदवार दिले आहेत, ते अजिबात निवडून येण्याची शक्यता नाही. जिथे काँग्रेसचा दावा होता, तिथे मित्रपक्षाने अगदीच चुकीचे उमेदवार दिले आहेत. जिथं बंडखोरी झालीय, दोन-तीन उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहेत, जिथे काँग्रेसचा बंडखोर उमेदवार सहज निवडून येईल असा दावा चव्हाण यांनी केला. आणखी वाचा