शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महायुतीत वाद अन् आघाडीत बिघाडी?; 'या' जागांवर मित्रपक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 7:10 PM

1 / 9
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राज्यात महायुती आणि मविआ यांच्यात जागावाटपाचं गुऱ्हाळ आणि उमेदवारांची घोषणा अशी धावपळ सुरू होती. त्यात प्रत्येक जागांवरून मित्रपक्षात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यात आज उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली तेव्हा काही जागांवर मित्रपक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार असल्याचं चित्र समोर आले.
2 / 9
विदर्भातील दिग्रस मतदारसंघातही ठाकरेंच्या शिवसेनेचे पवन जैसवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु याठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे हेदेखील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे विदर्भातील या मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत पाहण्यास मिळत आहे.
3 / 9
परांडा मतदारसंघातही मविआची हीच स्थिती आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने माजी आमदार राहुल मोटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे इथेही मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळू शकते.
4 / 9
पंढरपूर मतदारसंघातही महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच झाली. या मतदारसंघात काँग्रेसने भगीरथ भालके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर दुसरीकडे शरद पवारांनी अनिल सावंत यांना तुतारी चिन्हावर लढण्यासाठी मैदानात उतरवले आहे.
5 / 9
सांगोला मतदारसंघातही महाविकास आघाडीतून वाद होता. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु ही जागा मविआत शेकाप मागत होते. मात्र ठाकरेंनी जागा न सोडल्याने या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
6 / 9
महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही काही जागांवर २ उमेदवार उतरवण्यात आले आहेत. त्यात सांगलीतील मिरज जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तानाजी सातपुते यांना तिकीट देण्यात आले आहे. परंतु काँग्रेसनेही या मतदारसंघात मोहन वनखंडे यांना उमेदवारी दिली आहे.
7 / 9
बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात भाजपाकडून सुरेश धस यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे यांना तिकीट देण्यात आले आहे. महायुतीत या मतदारसंघातही भाजपा आणि अजित पवारांच्या पक्षात मैत्रीपूर्ण लढतीची स्थिती आहे.
8 / 9
मुंबईतील अणुशक्तीनगर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सना मलिक यांना महायुतीची उमेदवारी दिली आहे. परंतु त्याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने अविनाश राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुंबईतल्या या जागेवरही महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
9 / 9
महायुतीत मोर्शी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघात भाजपाने उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मविआ उमेदवारासोबतच महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी यांचे उमेदवार समोरासमोर आहेत.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे