शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 11:28 AM

1 / 9
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांकडून एक्झिट पोल दाखवण्यात आले. यात महायुती आणि महाविकास आघाडीकडे अनेकांचा कल आहे. मात्र मनसे, वंचित, तिसरी आघाडी यांच्याकडून काही मतदारसंघात महायुती आणि मविआ दोघांना धक्का दिला जाऊ शकतो असं बोललं जातं. प्रत्यक्ष निकालात काय चित्र असेल ते २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. मनसेकडून १३५ हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आलेत. मात्र त्यातील काही प्रमुख जागांवर मनसेमुळे तिरंगी लढत झालीय, यातील काही जागांवर मनसेला विजयाची आशा वाटत आहे.
2 / 9
२०१९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले होते. या मतदारसंघात पुन्हा राजू पाटील मनसेकडून रिंगणात आहेत. त्याठिकाणी शिंदेसेनेकडून राजेश मोरे आणि उद्धवसेनेकडून सुभाष भोईर यांचं आव्हान त्यांना आहे. राजू पाटील हे मागील निवडणुकीत ७ हजार मतांनी विजयी झाले होते त्यांनी एकसंघ शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या मतदारसंघात यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीला घेऊन ठाकरे गट उतरला आहे. त्यामुळे २ शिवसेनेतील मतांची फूट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मिळणाऱ्या अधिक मतांवर मनसेचे राजू पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे. २००९ साली या मतदारसंघात मनसेचा आमदार निवडून आला होता. मात्र २०१४ साली सुभाष भोईर यांनी मनसेचा पराभव केला. यंदा पुन्हा सुभाष भोईर रिंगणात आहेत. त्यामुळे मनसेसमोर हा मतदारसंघ टिकवणे आव्हानात्मक आहे तरीही राजू पाटील यांची क्रेझ पाहता मनसेला या मतदारसंघात पुन्हा विजयाची आशा आहे.
3 / 9
माहीम मतदारसंघात यंदा राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदार सदा सरवणकर हे महायुतीकडून रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. माहीम मतदारसंघातही २००९ साली मनसेचे नितीन सरदेसाई पहिल्यांदा आमदार झाले. मराठी बहुल मतदारसंघात मनसेला मानणाराही मोठा वर्ग आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मनसेचा येथून पराभव झाला आहे. मात्र २००९, २०१९, २०२४ या तिन्ही निवडणुकीत मनसेचा मतदार सरासरी ४० हजारांच्या घरात आहे. याठिकाणी निवडून येण्यासाठी मनसेला अधिकच्या मतांची गरज आहे. त्यात भाजपा नेत्यांनी उघडपणे अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची विधाने केली. शिवसेनेच्या मतांमध्ये पडलेली फूट इथं मनसेच्या पथ्यावर पडेल असं बोलले जाते. त्यात मतदानाच्या दिवशी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अमित ठाकरेंना मत दिल्याचे जाहीरपणे समोर आले. त्यामुळे भाजपाची मते मनसेच्या पारड्यात गेली का हे निकालाच्या दिवशीच कळेल. तूर्तास माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या विजयाची आशा मनसेला आहे.
4 / 9
शिवडी हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र याच गडाला २००९ साली मनसेने भगदाड पाडलं. २००९ साली या मतदारसंघातून बाळा नांदगावकर मनसेचे आमदार झाले. या मतदारसंघात यंदा पुन्हा बाळा नांदगावकर उभे आहेत. भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेने या मतदारसंघात उमेदवार न देता बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून बाळा नांदगावकर आणि मविआकडून अजय चौधरी यांच्यात थेट लढत आहे. शिवडीतही मनसेची ४० हजारांच्या आसपास मते आहेत. त्यात भाजपाची मतेही बाळा नांदगावकरांना मिळतील. त्यामुळे या मतदारसंघात मनसे पुन्हा विजयाचा झेंडा फडकवणार असा विश्वास मनसेला वाटतो. परंतु प्रत्यक्ष निकालात काय घडेल हे २३ नोव्हेंबरला कळेल.
5 / 9
भांडुप मतदारसंघ हादेखील मराठी बहुल भाग आहे. या मतदारसंघात मनसेने शिरीष सावंत यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून अशोक पाटील तर उद्धव ठाकरेंकडून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी मिळाली आहे. भांडूप मतदारसंघात २००९ साली मनसेचे शिशिर शिंदे विजयी झाले होते. सध्या शिशिर शिंदे हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. भांडुप मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत मनसेने ४२ हजार मते घेतली होती. मात्र शिवसेना-भाजपा युतीचे रमेश कोरगावकर या मतदारसंघात ७१ हजार मते घेऊन निवडून आले. आता भाजपा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे. २०१४ चा निकाल पाहिला तर या मतदारसंघात भाजपाच्या मनोज कोटक यांना ४३ हजार मते पडली होती. त्यामुळे यंदा भाजपाची मते कुणाच्या बाजूने झुकणार हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे भांडुप मतदारसंघातून शिरीष सावंत विजयी होतील अशी मनसेला आशा आहे.
6 / 9
ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जायचा. मात्र २०१४ साली शिवसेना-भाजपा युती तुटली आणि या मतदारसंघात भाजपाने तब्बल ७० हजाराहून अधिक मते घेत त्यावर कब्जा केला. याठिकाणी शिवसेनेला ५८ हजार मते पडली होती. २०१४ साली मनसेला या मतदारसंघात केवळ ८३०० मते पडली होती मात्र २०१९ चा निकाल पाहिला तर या मतदारसंघात मनसेने ७२ हजार मते घेतली पण त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीनं मनसेला पाठिंबा दिल्याचे चित्र होते. यंदाच्या निवडणुकीत मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे आणि भाजपाकडून पुन्हा संजय केळकर रिंगणात आहेत. अविनाश जाधव यांची तरुणांमधील क्रेझ पाहता त्याठिकाणी मनसेला चांगले यश मिळेल असं वाटते. परंतु प्रत्यक्ष मतांमध्ये अविनाश जाधव अव्वल ठरतात का हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
7 / 9
मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकमध्ये मनसेला मोठे यश मिळालं, याठिकाणी मनसेचे ३ आमदार आणि महापालिका सत्ता आली. मात्र अवघ्या ५ वर्षात नाशिकमध्ये मनसेच्या गडाला भगदाड पडलं. २०१४ साली मोदी लाटेत मनसेचे तिन्ही उमेदवार पडले. नाशिकमध्ये मनसेची सत्ता गेली. मात्र याच नाशिकमध्ये पश्चिम मतदारसंघात मनसेला विजयाची आशा आहे. याठिकाणी विद्यमान भाजपा आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात पक्षात नाराजी होती. त्याच नाराजीतून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील पक्षातून बाहेर पडले आणि ते मनसेच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दिनकर पाटील यांचं वैयक्तिक राजकीय वजन आणि मनसेची मते यातून नाशिक पश्चिम मतदारसंघात मनसे नेत्यांना विजयाची आशा आहे. परंतु याठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर यांचेही आव्हान आहे. त्यामुळे मनसे ही जागा स्वबळावर जिंकेल का हे निकालात कळेल.
8 / 9
२००९ साली खडकवासला मतदारसंघात मनसेचे रमेश वांजळे विजयी झाले होते. मात्र वांजळे यांच्या निधनानंतर २०१४ साली या मतदारसंघात मनसेकडून राजाभाऊ लायगुडे रिंगणात उतरले. त्याठिकाणी मनसेला ३४ हजार मते मिळाली. खडकवासला हा मतदारसंघ भाजपाचा गड आहे. त्याठिकाणी १ लाखाहून अधिक मते भाजपाला मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत मनसेनं इथं उमेदवार दिला नाही. या मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी थेट लढत झाली. त्यात अवघ्या २५०० मतांनी भाजपाचा विजय झाला. या मतदारसंघात यंदा रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे मनसेकडून निवडणूक लढवत आहे. रमेश वांजळे यांच्या जनसंपर्काची ताकद आणि मनसेचे मतदार यातून या मतदारसंघात २००९ सारखाच चमत्कार घडू शकेल असं मनसे नेत्यांना वाटते. यंदाच्या निवडणुकीत रमेश वांजळे यांच्या सुपुत्राच्या एन्ट्रीने मतदारसंघातील लढतीकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपा गड राखणार, राष्ट्रवादी भाजपाचा गड भेदणार की मनसे चमत्कार घडवणार हे २३ नोव्हेंबरच्या निकालात कळणार आहे.
9 / 9
हडपसर मतदारसंघात यावेळी महायुतीकडून चेतन तुपे आणि महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात मनसेने साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी थेट निवडणूक होत आहे. परंतु मतदारसंघातील भाजपा-शिवसेनेचे मतदार युती, आघाडीच्या बाजूने कौल देतात की मनसेला मतदान देतात अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती. प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळाल्याने ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर नाराज झाले होते. २०२४ साली मोदी लाटेतही महादेव बाबर यांनी हडपसर मतदारसंघात ५० हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात मनसेची २५-३० हजार मते आहेत तर भाजपाने २०१४ साली ८२ हजार मते घेतली होती. २०१९ साली राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांनी भाजपाच्या योगेश टिळेकरांचा ३ हजारांनी पराभव केला होता. आता या मतदारसंघात राष्ट्रवादी आमनेसामने आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांमध्ये फूट आणि भाजपाचं मतदान चेतन तुपेंना पडते की मनसेच्या साईनाथ बाबर यांच्या पारड्यात जाते यावरून निकाल लागणार आहे. या मतदारसंघात साईनाथ बाबर यांचीही तरुणांमध्ये क्रेझ आहे त्यामुळे हडपसर मतदारसंघातही मनसेला आशा आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेbig Battles 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाmahim-acमाहीमshivadi-acशिवडी