...म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व ठरतं इतरांपेक्षा वेगळं; पाच प्रमुख मुद्दे By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 1:03 PM
1 / 6 राज्यातील सर्व प्रश्नांची जाण असलेले, सर्व विषयांचा सखोल अभ्यास असलेले आजच्या पिढीतील नेते कोण, हा प्रश्न विचारला तर बहुतेक सगळ्यांचं उत्तर एकच असतं आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. युती-आघाडीच्या काळात सलग पाच वर्षं मुख्यमंत्रिपद सांभाळणं हे साधं काम नाही. पण ही किमया त्यांनी करून दाखवली. त्यासोबत गृहखात्याचा अत्यंत कठीण कारभारही नेटाने सांभाळला. त्यानंतर, १०० हून जास्त जागा निवडून आणण्याचा पराक्रमही त्यांच्या नेतृत्वातच झाला. पुढे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. त्यांचं नेतृत्व इतर नेत्यांपेक्षा वेगळं कसं, हे पुढील पाच मुद्द्यांमधून लक्षात येतं. 2 / 6 राज्याचं नेतृत्व करताना मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीला राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांची पूर्ण जाणीव असणं आवश्यक आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास केल्यानं, फडणवीसांना चांद्यापासून बांद्यापर्यंतचे सगळे विषय माहीत होते-आहेत. अभ्यासू वृत्ती असल्यानं आमदार असताना त्यांनी अनेक विषयांची, महाराष्ट्रातील प्रश्नांची सखोल माहिती मिळवली होती. शेतकरी-कष्टकऱ्यांपासून ते उद्योजक-उद्योगपतींपर्यंत आणि मूलभूत सोयीसुविधांपासून ते मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीपर्यंत सर्व विषयांचं ज्ञान त्यांनी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मिळवलं आहे. त्यामुळेच राज्याचं आणि पक्षाचंही नेतृत्व करताना ते कुठल्याही प्रसंगी डगमगले नाहीत. विविध स्तरांतील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 3 / 6 जातीपातीचं राजकारण हा सध्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय झालाय. पण, फडणवीसांनी जात-पात न पाहता सर्व समाजघटकांसाठी काम केलं. मग ती ओबीसी विकास मंत्रालयाची स्थापना असो किंवा मराठा आरक्षणाचा विषय. जात-पात-पंथ न पाहता ते विकासाचा मुद्दा घेऊनच पुढे चालत राहिले. आपली जात कोणती आणि समोरच्याची कोणती, असा विचार केल्याचं उदाहरण नाही. त्यापेक्षा ते जलसिंचन, ग्रामविकास, कृषी योजना, मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ या विषयांवर जास्त बोलल्याचं दिसतं. 4 / 6 देशाला फाइव्ह ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा विषय असो किंवा ग्रामीण भागातील रोजगाराचा मुद्दा; दोन्ही विषयांचं ज्ञान आणि जाण देवेंद्र फडणवीसांना आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक आणण्याच्या कामात त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री असतानाच नव्हे, तर उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी आपलं नेटवर्क वापरून अनेक परदेशी कंपन्या, उद्योग महाराष्ट्रात आणले. 5 / 6 सध्याचं राजकारण घराणेशाहीच्या भोवती फिरत असल्याचं चित्र दिसून येते. एकाच घरात २-२ पदे, आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदे दिल्याचेही दिसून येते. राज्यातही अशी बरीच उदाहरणं आहेत. आपल्याच नात्यातील, परिवारातील व्यक्तीला मोठं करण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. पण इथेही देवेंद्र फडणवीस वेगळे ठरतात. वयाच्या २२ वर्षी सक्रिय राजकारणात आलेल्या फडणवीसांनी नगरसेवक, महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री इतकी महत्त्वाची पदे सांभाळली. पण, त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला लाभाचं पद दिल्याचे दिसत नाही. उलट, आपल्या कुटुंबातील कुणीही राजकारण येणार नसल्याचंही ते सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदर्श मानूनच ते वाटचाल करत आहेत. 6 / 6 संघ विचारांच्या मुशीतून आलेले देवेंद्र फडणवीस यांची पक्षावरची निष्ठाही लक्षवेधी ठरते. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ब्रीदवाक्याप्रमाने फडणवीसांनी कायम पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन केलं. राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर पक्षाच्या सांगण्यावरून ते विरोधी पक्षनेते झालेच, पण पुढे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेण्याचा आदेशही फडणवीसांनी शिरसावंद्य मानला आणि कुठलीही तक्रार न करता हे पद सांभाळलं. आजही ते स्वतःला भाजपाचा सामान्य कार्यकर्ता मानतात आणि पक्ष सांगेल तेच यापुढेही करणार असल्याचं ठामपणे सांगतात. आणखी वाचा