शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 9:48 AM

1 / 10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भल्याभल्या राजकीय अभ्यासकांना अवाक् केलं आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीने २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवलाय. तर विरोधी महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलंय. आता या निकालाचं विश्लेषण करणारी वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे.
2 / 10
समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुतीला ४९.६ टक्के मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ ३५.३ टक्के मतं मिळाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये महायुतीमधील घटक पक्षांना १३८ ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाल्याचं आणि १६ ठिकाणी लाखभराचं मताधिक्य मिळाल्याचं समोर आलं आहे.
3 / 10
महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी १५४ जागांवर विजयी उमेदवारांनी ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. त्यात महायुतीने १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. तर महाविकास आघाडीला केवळ १६ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्यात यश मिळालं.
4 / 10
महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने १४९ जागांवर निवडणूक लढून १३२ जागा जिंकल्या. तसेच २६.८ टक्के मतं मिळवली. भाजपासाठी ही कामगिरी विक्रमी ठरली आहे. भाजपाने जिंकलेल्या एकूण जागांपैकी ८४ जागा ह्या ५० टक्क्यांहून अधिकच्या मताधिक्याने जिंकल्या. तर भाजपाने २६ जागांवर ६० टक्क्यांहून अधिकच्या मतं मिळवून जिंकल्या. सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये तर भाजपाने एकूम मतदानापैकी ८०.४ मतं मिळवून विजय मिळवला.
5 / 10
महायुतीच्या महाविजयामध्ये भाजपाबरोबरच भाजपाच्या मित्रपक्षांनीही चमकदार कामगिरी केली. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने दणदणीत यश मिळवलं. शिवसेना शिंदे गटाने जिंकलेल्या ५७ जागांपैकी ३० जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं घेत बाजी मारली. तर अजित पवार गटाने ४१ पैकी २० हून अधिक जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली.
6 / 10
या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाने सहा जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. काँग्रेसला पाच जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली. तर ठाकरे गटाने ४ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं घेत विजय मिळवला. महाविकास आघाडील केवळ तीन जागांवर ६० टक्क्यांहून अधिक मिळाली. तर महाविकास आघाडीने ७ जागांवर ३० ते ४० टक्क्यांवर मत मिळवून विजय मिळवला. तर ४० ते ५० टक्के मतांसह महाविका आघाडीने २७ जागांवर विजय मिळवला.
7 / 10
सत्ता मिळवण्याचे प्रयत्न अयशस्वी झालेल्या महाविकास आघाडीला बसलेला आणखी एक धक्का म्हणजे ३४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार हे तिसऱ्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर राहिले. २२ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. तर ११ जागांवर महाविकास आघाडीली ११ टक्क्यांहून कमी मतं मिळाली.
8 / 10
आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे या निकालांमध्ये १६ मतदारसंघात विजयी उमेदवारांनी एक लाखांहून अधिकचं मताधिक्य घेतलं. तसेच लाखभराचं मताधिक्य घेणारे सर्व उमेदवार हे महायुतीचे होते. शिरपूरमध्ये महायुतीमधील भाजपाचा उमेदार सर्वाधिक १ लाख ४६ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाला.
9 / 10
दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवता आला नाही. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा मतदारसंघामधून सर्वाधिक ९६ हजार २३० मतांनी विजयी झाले. हेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं सर्वात मोठं मताधिक्य ठरलं.
10 / 10
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणिुकीत महायुती ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडली होती. त्यापैकी ५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवत बाजी मारली.
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४