देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:24 IST
1 / 7महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली जात आहेत. त्यावरून वेगवेगळे दावे प्रतिदावेही केले जात आहेत. दरम्यान, या निवडणुकीत लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. या योजनेसह देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मागच्या अडीच वर्षांत तसेच मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेले निर्णय परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. यामधील काही प्रमुख निर्णय आणि योजना पुढील प्रमाणे.2 / 7२०२२ मध्ये सत्तांतर होऊन पुन्हा सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये असे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात दिले जातात. राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. 3 / 7देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या काळात २०२३ मध्ये वित्तमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना एसटी बसमध्ये महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ महिलांकडून मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. तसेच प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळालाही त्याचा फायदा होत आहे. 4 / 7महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वित्तमंत्रालयाचा कार्यभार सांभाळताना २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरून पीक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २०२३-२४ पासून ही योजना महाराष्ट्रात लागू झाली होती. या योजनेचा लाभही लाखो शेतकऱ्यांना मिळत आहे. 5 / 7२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा मुंबईमध्ये केवळ एकच मेट्रो प्रकल्प होता. मात्र त्यानंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन मुंबईमध्ये मेट्रो मार्गाचं जाळं विणण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली. त्यामधून आता मुंबईतील विविध मार्गावरील मेट्रो पूर्णत्वास जात आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. 6 / 7राज्याच्या आर्थिक विकासासाठी दळणवळणाची अद्ययावत साधने उपलब्ध असणे आवश्यक असते या विचारामधून देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गासह अनेक रस्त्यांच्या बांधणीवर विशेष लक्ष दिले. मुंबईतही कोस्टल रोड, अटल सेतू यांसारख्ये मार्ग फडणवीस यांच्या काळात त्यांच्या पुढाकाराने पूर्णत्वास गेले आहेत. 7 / 7चांगल्या शेतीसाठी पाण्याची सर्वाधिक आवश्यकता असते, या विचारामधून देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही मत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेततळ्यांसाठी आर्थिक मदत केली जाते. याबरोबरच शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजनाही देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झाली आहे.