शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 2:03 PM

1 / 11
यावेळची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या घोषणा आणि वक्तव्यांमुळे गाजत आहे. त्यातील काही विधानांमुळे वाद निर्माण झाले तर काही विधानांनी प्रचाराचा टोन सेट केला. त्यात सत्ताधारी महायुतीमधील भाजपाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांमुळे भाजपाला निवडणूक प्रचाराला आपल्याला हवी तशी दिशा देता आली. तसेच त्यातील काही विधानं ही निकालामध्ये निर्णायक ठरू शकतात, असंही बोललं जात आहे. अशाच काही विधानांचा घेतलेला हा आढावा .
2 / 11
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेली बटोगे तो कटोगे ही घोषणात चांगलीच प्रभावी ठरली होती. आता महाराष्ट्रातही प्रचारादरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी या घोषणेचा वारंवार पुनरुच्चार केला. भाजपाच्या अनेक नेत्यांनीही ही निवडणूक उचलून धरली. ही घोषणा एवढी प्रभावी ठरली की त्याला प्रत्युत्तर देता विरोधी पक्षांची तारांबळ उडाली.
3 / 11
एकीकडे योगींच्या बटोगे तो कटोगे या घोषणेचा प्रभाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात वाढलेल्या जातीजातीमधील तणावांच्या पार्श्वभूमीवर एक रहोगे तो सेफ रहोगे ही घोषणा दिली. या घोषणेचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून आली. तसेच अनेक मतदारसंघात या घोषणेचा प्रभाव दिसून येत आहे.
4 / 11
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात अल्पसंख्याक समुदायाकडून भाजपाविरोधात करण्यात आलेल्या एकगठ्ठा मतदानाचा मोठा फटका भाजपाला बसला होता. त्याला वोट जिहाद असं नाव देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वोट जिहादला आम्ही मतांच्या धर्मयुद्धाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देऊ, असं विधान केलं आहे. त्या विधानाचीही खूप चर्चा होत आहे.
5 / 11
मागच्या दीड वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलेलं आहे. तसेच या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. एवढंच नाही तर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे भाजपाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्या पार्श्वभीमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाबाबत सूचक विधान केलं होतं. राज्यातील ८० टक्के मराठा समाज हा हिंदुत्ववादी आहे उरलेले २० टक्के हे पुरोगामी असतील. मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिलेला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
6 / 11
महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, याबाबत अनेक गौप्यस्फोट करत भाजपाने या सर्वांच खापर शरद पवार यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच शरद पवार यांनी दिलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली, असा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या सत्तास्थापनेच्या खेळावरून शरद पवार यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
7 / 11
महिनाभरापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कलम ३७० पुन्हा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत पारित करण्यात आला. मात्र याबाबत काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्सचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. इंदिरा गांधी स्वर्गातून खाली आल्या तरी कलम ३७० पुन्हा येणार नाही, असा इशारा अमित शाह यांची दिला होता. त्याचीही खूप चर्चा झाली.
8 / 11
लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्याच्या भाजपाला फटका बसला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा काँग्रेसवर उलटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अमित शाह यांनी आरक्षणाबाबत केलेल्या एका विधानाची चर्चा सुरू आहे. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना ‘एससी’, ‘एसटी’ आणि ओबीसींच्या हक्कांचे आरक्षण मिळणार नाही’, असा दावा अमित शहा यांनी एका प्रचारसभेत केला होता.
9 / 11
मुस्लिम मुद्द्यावरून भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीला अनेकदा लक्ष्य केले. त्यात महाविकास आघाडी ही सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी ठाकरे-पवारांची आघाडी आहे, असं अमित शाह यांनी केलेलं विधानही चर्चेचा विषय ठरलं.
10 / 11
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली, तेव्हा नागपूरमध्ये संविधान सन्मानाबाबतच्या एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर अर्बन नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. तसेच त्यामुळेच ते तांबड्या कव्हरमधील संविधान दाखवत असतात, असं विधान केलं होतं. या विधानाला प्रत्युत्तर देणं काँग्रेससह इतर विरोधकांना कठीण गेलं होतं. तसेच हा मुद्दा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चर्चेत राहिला.
11 / 11
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाचा वचननामा हा घरात बसून प्रसिद्ध केला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरात बसून कारभाराची सवय गेली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला होता.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुतीNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस