शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 4:23 PM

1 / 6
मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात मनसेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात उमेदवारी दिल्याने येथील हायप्रोफाइल लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं आहेत. त्यातच आता माहिममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केल्याने येथील निवडणूक आता अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
2 / 6
शिवसेनेचं शक्तिकेंद्र मानलं जाणारं शिवसेना भवन हे ज्या माहिम विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात येतं तिथे शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मनसे आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात महेश सावंत यांच्या रूपात एका शिवसैनिकाला उमेदवारी देत उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महेश सावंत हे कोण आहेत याचा आपण आढावा घेऊयात.
3 / 6
सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये विभागप्रमुख पदावर असलेले महेश सावंत हे मुळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातोंड गावातील असून, त्यांचे वडील चाकरमानी होते. प्रभादेवी परिसरातील सामाजिक कार्यात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या महेश सावंत यांनी मागच्या २० ते २५ वर्षांमध्ये त्यांनी सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख विभागप्रमुख अशी राजकीय वाटचाल केली आहे.
4 / 6
एकेकाळी महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे निटवर्तीय होते. तसेच २००९ मध्ये सदा सरवणकर यांच्यासोबत काँग्रेसमध्येही गेले होते. मात्र नंतर ते पुन्हा शिवसेनेत आले होते. मात्र २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यात मतभेद झाले.
5 / 6
दरम्यान, २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली गेल्यानंतर महेश सावंत यांनी माहिममधील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
6 / 6
त्यानंतर महेश सावंत हे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय झाले होते. तसेच २०२२ मध्ये पक्षात पडलेल्या फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती. तसेच विभागप्रमुखपद सांभाळत असताना त्यांनी माहिम परिसरात ठाकरे गटाची बांधणी केली होती. आता उद्धव ठाकरें यांनी त्यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने येथील लढत ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mumbaiमुंबईmahim-acमाहीमUddhav Thackerayउद्धव ठाकरे