Maharashtra Assembly Election 2024 vidarbha 62 constituencies explainer in marathi
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं? By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 5:29 PM1 / 10विदर्भात २०१४ पर्यंत काँग्रेसचा वृक्ष डौलाने बहरत होता, मात्र मोदी लाटेत काँग्रेसच्या अनेक फांद्या गळून पडल्या अन् भाजपचे कमळ फुलले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागांवर भाजपला रोखण्यात यश आल्याने काँग्रेसचे हौसले बुलंद आहेत, पण लोकसभेच्या धक्क्यातून सावरत थेट घराघरांपर्यंत पोहोचलेल्या भाजपने काँग्रेससमोरचे आव्हान अधिक कडवे केले आहे.2 / 10२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त २९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने १५, तर राष्ट्रवादीने ६ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर विदर्भात झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातही भाजपला थांबविण्यात आघाडीला यश आले. परिणामी, सध्या काँग्रेसच्या आशा पल्लवीत आहेत. उपराजधानी नागपूरचा किल्ला सर करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसमोर आहे.3 / 10नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण या चार मतदारसंघांत तुलनेत काँग्रेसचे उमेदवार प्रभावी आहेत. नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे पाटील आणि कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात सुरेश भोयर या दोन हॉट सीट आहेत. सावनेर, उमरेडमध्ये घमासान असून, रामटेकच्या गडावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बंडखोर राजेंद्र मुळक यांच्या बंडाचे निशाण सध्या चर्चेत आहे.4 / 10भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजकीय कौशल्यावर आहे. त्यांनीच भंडारा व आमगावात नवीन चेहरा, तर अर्जुनी मोरगावमध्ये बाहेरचा उमेदवार देण्याची जोखीम घेतली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील नऊपैकी सहा जागांची जबाबदारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर आहे. राजुरा, चिमूर, ब्रह्मपुरीत काँग्रेस वरचढ आहे. चंद्रपूर, बल्लारपूर व वरोऱ्यात काट्याची लढत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बंधू प्रवीण काकडे यांच्या उमेदवारीचा डाव खेळला आहे.5 / 10अशीच जबाबदारी अमरावती जिल्ह्यात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांची त्यांना साथ आहे. प्रहार, वंचित, मनसे, तसेच बंडखोरांमुळे होणारे मतविभाजन काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल. 6 / 10वर्धा जिल्ह्यात मित्रपक्षांची भूमिका निर्णायक ठरेल. तेथे जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यवतमाळात बाळासाहेब मांगूळकर मागील निसटत्या पराभवाचा वचपा काढण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. दिग्रसमध्ये शिंदेसेनेचे संजय राठोड व काँग्रेसचे माणिकराव ठाकरे या आजी-माजी मंत्र्यांची २० वर्षांनंतर होणारी लढत लक्षवेधी आहे.7 / 10राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेची ताकद विदर्भात मोठी नसली, तरी त्यांच्या मतांची जोड मिळाल्यास निकाल बदलू शकतात, ही रणनीती ठरवत काँग्रेसने एकूण ६२ जागांपैकी ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यांपैकी ३५ जागांवर थेट भाजपशी सामना आहे. यामध्ये १५ जागांवर भाजपचे विद्यमान आमदार रिंगणात आहेत.8 / 10२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसची विदर्भात उत्तम कामगिरी राहिली. राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. २०१४ मध्ये केवळ दहा जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे राज्याच्या सत्तेतून काँग्रेस बाहेर गेली. २०१९ मध्ये विदर्भात १५ जागा. जिंकत काँग्रेसने आलेख वाढविला भाजपला त्याचा फटका बसला.9 / 10लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अकरा जिल्ह्यांमधील ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४३ जागांवर मताधिक्य. गेल्या विधानसभेवेळी भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमधील मताधिक्य काँग्रेससाठी आशादायी आहे.10 / 10अकोल्यात काँग्रेसला भाजपचा भक्कम किल्ला भेदता आलेला नाही. अकोला पश्चिममध्ये गेल्यावेळी विजयाच्या दारापर्यंत काँग्रेस पोहचली होती. यावेळी पक्षातील बंडखोरी टाळण्यात यश आले. तरी आघाडीत मतभेद कायम आहेत. बुलढाण्यातील खामगाव, मलकापूर, चिखली या तीन मतदारसंघांत काँग्रेस व भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये तीव्र चुरस आहे, जळगाव जामोदमध्ये गेल्या वेळचाच सामना पुन्हा रंगला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications