शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:18 AM

1 / 10
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच अनेक एक्झिट पोलमधून अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळत असल्याने निकालांनंतर छोटे पक्ष आणि अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असतील असा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण राज्यातील कोणकोणत्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाजी मारू शकतात, याचा आपण आढावा घेऊयात.
2 / 10
मागच्या पाच वर्षांत झालेली उलथापालथ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अस्तित्वात आलेले चार गट, महाविकास आघाडी आणि महायुतीची झालेली फेरमांडणी यामुळे या विधानसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात समीकरणं बदलली होती. त्यामधून राज्यात जवळपास सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. सद्यस्थितीत राज्यातील किमान ५० ते ६० मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत असलेले उमेदवार प्रभाव टाकतील, असं दिसत आहे. तसेच त्यापैकी काही जणांना विजयाची लॉटरीही लागू शकते. विजयाची सर्वाधिक शक्यता आहे, अशा ७ प्रमुख उपक्ष उमेदवार आणि मतदारसंघावर आता आपण नजर टाकूया.
3 / 10
विदर्भातील रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी शक्यता आहे. रामटेकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विशाल बरबटे यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र येथे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक यांनी दोन्ही उमेदवारांना कडवी टक्कर दिल्याचं बोललं जात आहे. येथील काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्व आणि पक्षसंघटनेचा मुळक यांना पाठिंबा अधिक दिसत होता. अशा परिस्थितीत सांगली पॅटर्न प्रमाणे येथेही मतदान होऊन त्यात अपक्ष राजेंद्र मुळक हे बाजी मारू शकतात.
4 / 10
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या प्रमुख उमेदवारांना पराभवाचा धक्का देऊन अपक्ष उमेदवार विजयी होऊ शकतो, असा आणखी एक विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली. सांगलीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बंड करत जयश्रीताई पाटील ह्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. त्यामुळे सांगलीमध्ये भाजपाचे सुधीर गाडगीळ यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध जयश्रीताई पाटील अशी लढत रंगली. सांगतील एकूण परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेत होऊन जयश्रीताई पाटील ह्या धक्कादायक निकाल नोंदवत विजयी होऊ शकतात, असं बोललं जात आहे.
5 / 10
सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातही धक्कादायक निकाल लागून अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी शक्यता आहे. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे हर्षद कदम आमने सामने होते. मात्र येथे शरद पवार गटाकडून इच्छूक असलेल्या सत्यजितसिंह पाटणकर यांनी बंडखोरी केल्याने येथील लढत तिरंगी झाली. सद्यस्थितीमध्ये येथे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत असली तरी त्यामध्ये शिवसेनेच्या मतांचं विभाजन झाल्याची चर्चा आहे. तसेच त्याचा फायदा होऊन अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर हे बाजी मारून जाऊ शकतात, असा दावा केला जात आहे.
6 / 10
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातही अपक्ष उमेदवार बाजी मारेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी घेतलेल्या माघारीमुळे येथे बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली होती. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध अपक्ष राजेश लाटकर यांच्यात मुख्य लढत झालीय. तसेच काँग्रेसचे येथील बडे नेते सतेज पाटील यांनी ही लढत प्रतिष्ठेची केलेली असल्याने या मतदारसंघातून राजेश लाटकर हे विजयी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
7 / 10
इंदापूर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातही धक्कादायक निकाल लागून अपक्ष उमेदवार विजयी होऊ शकतो. इंदापूरमध्ये महायुतीकडून अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्ता भरणे आणि शरद पवार गटाकडून माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे रिंगणात होते. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रवीण माने हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने येथील लढत तिरंगी झाली होती. सोनाई डेअरीच्या माध्यमातून त्यांनी या भागात आपला प्रभाव निर्माण केलेला आहे, त्याचा त्यांना मतदानात फायदा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच भारणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्ही उमेदवार नको असलेला मतदार नवा चेहरा म्हणून प्रवीण मानेंच्या मागे उभा राहिल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत प्रवीण माने हे आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवू शकतात. त्याची शक्यता कमी असली तरी असं घडल्यास तो धक्कादायक निकाल ठरेल.
8 / 10
नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्येही अपक्ष उमेदवाराचा विजय होऊन धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहेत. येथे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे गणेश धात्रक अशी मुख्य लढत झाली. मात्र समीर भुजबळ यांनी बंडखोरी केल्याने येथील लढतीत रंगत आली होती. या मतदारसंघात भुजबळ कुटुंबीयांचा प्रभाव राहिलेला आहे, त्याचा फायदा समीर भूजबळ यांना होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत कांदे आणि धात्रक यांच्यामध्ये शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली आणि भुजबळांना मानणारा मतदार पाठीशी राहिला तर समीर भुजबळ हे नांदगावमधून विजयी होऊ शकतात.
9 / 10
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या लक्षवेधी लढतीतही अपक्ष उमेदवार बाजी मारेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कन्नडमध्ये ठाकरे गटाकडून उदयसिंह राजपूत, शिंदे गटाकडून संजना जाधव आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी तिरंगी लढत झाली होती. येथील लढतीत अपक्ष लढत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे बाजी मारतील, अशी शक्यता आहे.
10 / 10
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणालाही राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या १४५ जागांचा आकडा पार करता आला नाही तर अपक्ष निवडून आलेले आमदार किंगमेकर ठरतील, तसेच त्यांच्या हातात सत्तेचा लगाम राहील, अशी चिन्हे आहेत.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस