शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 8:48 PM

1 / 6
काल लागलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर काही दिवसांतच विधानसभेची निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्रातही काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला हरयाणातील निकालांमधून काही धडे शिकावे लागणार आहेत.
2 / 6
त्यातील पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात विजयासाठी मतांची टक्केवारी पुरेशी ठरणार नाही. हरयाणामधील निकालांमधून काँग्रेस भाजपाच्या कोअर मतदारांना आपल्याकडे खेचण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसला नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला असला तरी भाजपाने आपला मतांचा टक्का कायम राखला आहे. त्यामुळे भाजपाचा हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे वळवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस समोर असेल.
3 / 6
हरयाणामधून काँग्रेसने घेण्यासारखा दुसरा धडा म्हणजे पक्षाला मित्रपक्षांसोबत व्यवस्थित जुळवून घ्यावं लागणार आहे. हरयाणामध्ये काँग्रेसला आपसोबत न केलेल्या आघाडीचा फटका बसला होता. आता पक्षाला महाराष्ट्रात ही चूक टाळावी लागेल.
4 / 6
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी संविधान आणि आरक्षण हे मुद्दे निर्णायक ठरले होते. मात्र आता हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत हरयाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही चांगलं यश मिळवलं होतं. मात्र आता विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निकालांची पुनरावृत्ती होत नाही हे दिसून आलं आहे. त्यामुळे लोकसभेत यश मिळालं म्हणजे विधानसभेतही मिळेल या भरवशावर राहता येणार नाही.
5 / 6
हरयाणामध्ये नेतृत्वावरून पक्षांतर्गत झालेली लढाई आणि वाद काँग्रेसच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण ठरले होते. मागच्या काही काळात अनेक राज्यांत काँग्रेसमध्ये हीच परिस्थिती दिसून आली होती. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पक्षातील नेत्यांमधील समन्वय निवडणुकीपूर्वी साधावी लागेल.
6 / 6
हरयाणामध्ये काँग्रेसने राज्यातील प्रभावी जात असलेल्या जाट समाजावर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र भाजपाने नॉन जाट जातींना एकत्र आणून काँग्रेसचा डाव हाणून पाडला होता. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा कशा प्रकारचं सामाजिक समिकरण जुळवतं हे काँग्रेसला पाहावं लागेल.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी