महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 09:20 IST
1 / 11महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मागील ४६ वर्षात ९ उपमुख्यमंत्री बनले आहेत, त्यातील एकही मुख्यमंत्री बनू शकला नाही. गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले होते, ते आता हा रेकॉर्ड मोडतात का हे बघावे लागेल. अद्याप महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाबाबत ठोस निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे फडणवीसांच्या नावावरही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 2 / 11राज्यात गोपीनाथ मुंडे, अजित पवारसारखे दिग्गज नेते उपमुख्यमंत्री बनलेत परंतु आजपर्यंत त्यातील कुणी मुख्यमंत्री बनू शकले नाही. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ या काळात सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे दुसरे नेते आहेत. मात्र २०१९ नंतरच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे फडणवीस आधी मुख्यमंत्री, नंतर विरोधी पक्षनेते आणि मग उपमुख्यमंत्री बनले आहेत.3 / 11१९७८ मध्ये काँग्रेसच्या वसंतदादा पाटील सरकारमध्ये नाशिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री बनले. ते ३ महिने या खुर्चीवर होते. त्याच वर्षी शरद पवारांच्या राजकीय डावपेचामुळे तिरपुडे यांना पद सोडावे लागले आणि शरद पवारांनी सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्री बनवलं. सोळंके १ वर्षाहून अधिक काळ या पदावर होते. 4 / 11१९८३ मध्ये नाशिकराव तिरपुडे मुख्यमंत्री बनतील अशी खूप चर्चा होती परंतु पुन्हा एकदा वसंतदादा पाटील यांनी बाजी मारली. १९८३ साली जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले तेव्हा रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. आदिक काँग्रेसमधील मुरब्बी राजकारणी होते, १९८५ पर्यंत रामराव आदिकांनी उपमुख्यमंत्री पद सांभाळले. आदिक यांच्या नावाचीही मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा झाली, परंतु ते त्या खुर्चीपर्यंत पोहचले नाहीत.5 / 11महाराष्ट्रात पहिल्यांदाच १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा सरकार बनलं. शिवसेनेने मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवले तर भाजपाने गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री बनवले. १९९९ मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर सहा महिन्यात काँग्रेससोबत ते सरकारमध्ये आले.6 / 11१९९९ मध्ये काँग्रेसचं सरकार बनलं तेव्हा मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला आणि उपमुख्यमंत्रिपदाची माळ राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांच्या गळ्यात पडली. सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या काळात भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले परंतु २००३ नंतर छगन भुजबळ यांच्यावरील एका आरोपामुळे ते बाजूला झाले. तेव्हापासून आजपर्यंत ते कधीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आले नाहीत.7 / 11शरद पवारांनी २००३ साली विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री बनवले. त्यानंतर २००४ साली आर.आर पाटील यांना उपमुख्यमंत्री बनवलं. हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत कधी चर्चेत आले नाहीत. शरद पवारांनी २०१० साली पहिल्यांदाच पुतण्या अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले. 8 / 11अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे परंतु राजकीय समीकरणामुळे ते अद्याप मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. 9 / 11देवेंद्र फडणवीस प्रथा मोडणार? - २०१४ साली भाजपाचं सरकार आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. २०१९ पर्यंत फडणवीसांनी सांभाळल्यानंतर पुन्हा तेच मुख्यमंत्री होतील अशी आशा होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युती तोडण्याचा निर्णय घेतल्यानं फडणवीसांच्या हातून मुख्यमंत्रिपद निसटलं. 10 / 11जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले, तेव्हा एकनाथ शिंदेंना सोबत घेत भाजपाने राज्यात महायुतीचं सरकार परत आणलं. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा असतानाच भाजपाने शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद सांभाळण्याची जबाबदारी पक्षाने दिली. 11 / 11५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर पक्षाच्या आदेशाने उपमुख्यमंत्रिपद घेतलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. २०२४ च्या निकालात भाजपाला १३२ हून अधिक जागा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. त्यात फडणवीसांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाची पसंती असल्याने ते मुख्यमंत्री होऊन ही प्रथा मोडतील का हा प्रश्न आहे.