बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदानावेळी तुफान राडा; कुठे काय घडलं? A टू Z घटना! By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 8:47 AM
1 / 11 विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या महोत्सवाला परळी मतदारसंघातील वेगवेगळ्या राड्यांमुळे गालबोट लागले. परळी मतदारसंघातील धर्मापुरी, परळी शहर, घाटनांदूर, केज तालुक्यातील विडा आणि पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथे हाणामारी, तोडफोड, कॅमेरे बंद ठेवण्यासारख्या घटना घडल्या. त्यामुळे या महोत्सवाचा शिमगा झाला. 2 / 11 रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा होत्या. जिल्ह्यात सहा वाजेपर्यंत मतदान ६७.३४ टक्के एवढे झाले. जिल्ह्यात २४१६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया चालली. २२ लाख २७ हजार ८४४ मतदार यावेळी पात्र होते. सकाळी गुलाबी थंडीत मतदार घराबाहेर पडले नाहीत; परंतु ९ नंतर मतदानाचा टक्का वाढत राहिला. याच दरम्यान गैरप्रकाराचे कथित व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. 3 / 11 परळी मतदारसंघातील धर्मापुरीसह इतर मतदान केंद्रांवर कॅमेरे बंद ठेवून मतदान केले जात होते. यावर मविआचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आक्षेप नोंदवित निवडणूक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्याच शरद पवार गटाच्या माधव जाधव या नेत्याला धनंजय मुंडे समर्थकांनी बेदम मारहाण करत मतदान केंद्राबाहेर हाकलले. याचे पडसाद जाधव यांचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे उमटले. काही लोकांनी मतदान केंद्रात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत इव्हीएम फोडल्या. तसेच इतर साहित्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे दोन तास प्रक्रिया बंद पडली होती. 4 / 11 नवीन मशीन आल्यावर मतदारांनी हक्क बजावण्यास सुरुवात केली. असेच प्रकार पाटोदा आणि केज तालुक्यातही घडले. यामुळे शांततेत सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला दुपारी गालबोट लागण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याप्रकरणाची नोंद झाली नव्हती. केज मतदारसंघातील आनंदवाडी गावामध्ये मतदान केंद्रातील कर्मचारी उल्हास दामोदर थिगळे यांना नवनाथ देवगुडे (रा. आनंदवाडी) याने मारहाण करत कामात अडथळा आणला. ओळखपत्राशिवाय मतदान करू देत नसल्याच्या कारणा वरून कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून अंगावर धाऊन जाऊन हातातील लोखंडी कड्याने डोळ्यावर बुक्क्या मारून जखमी केले. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. ए. जंघाळे हे करत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. 5 / 11 विड्यात बोगस मतावरून भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले: बोगस मतदान करण्यावरून भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हा प्रकार केज तालुक्यातील विडा येथील मतदान केंद्रावर बुधवारी दुपारी घडला. या मारहाणीचा कथित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. केज विधानसभा मतदार संघात येत असलेल्या विडा येथे मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरू असताना दुपारी एक जण बोगस मतदान करताना समोर आला. याची विचारणा भाजप गटाकडून करण्यात आली. यावेळी भाजपचा स्थानिक नेता व शरद पवार गटाचे सरपंच व त्यांचे वडील यांच्यात मतदान केंद्रावर हाणामारी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. ही मारामारी सुरू असताना काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांच्यातील हा वाद मिटला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. 6 / 11 घाटनांदूरमध्ये मशीनसह साहित्याची तोडफोड; दोन तास मतदान थांबले: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील सातही बूथवर अज्ञात जमावाने हल्ला करून बूथवरील मशीन फोडल्या. शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मतदानप्रक्रिया बंद पाडली. दोन तास मतदान थांबल्यानंतर नवीन मशीन लावण्यात आल्या, त्यानंतर भीतीच्या वातावरणात मतदारांनी आपला हक्क बजावला. घाटनांदूर येथल सोमेश्वर विद्यालयातील बूथ क्र. २८०, २८१, २८३ यावर अज्ञात जमावाने तोडफोड केली. जि.प. कन्या शाळेतील बूथ क्र. २८२ येथेही असाच प्रकार घडला. तेथील महिला कर्मचारी घाबरल्याने त्यांचा बीपी वाढला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा सुरडकर व डॉ. विलास माले यांनी त्यांच्यावर उपचार केले. तसेच जि.प. केंद्रीय शाळा येथील बूथ क्र. २७६, तोडफोडीअगोदरचे मतदान सुरक्षित घाटनांदूरसह परिसरातील मतदानप्रक्रिया बंद पाडण्यात आली. काही ठिकाणी मशीनही फोडल्या; परंतु या गैरप्रकारापूर्वी ज्यांनी मतदान केले आहे, त्यांचे मतदान सुरक्षित असल्याचा दावा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केला. २७७, २७८ येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मतदान प्रक्रिया बंद पाडण्यात आली. त्यानंतर बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. 7 / 11 चोथेवाडीचे बूथ घेतले ताब्यात: घाटनांदूर जवळ असलेल्या चोथेवाडी येथे बूथ क्रमांक २८६ दुपारी दोन वाजता बूथ ताब्यात घेऊन तोडफोड करण्यात आली. मशीन बंद पाडल्या होत्या. झोनल ऑफिसर यांनी दुपारी चार वाजता नवीन मशीन जोडल्यानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत झाली. या ठिकाणीसुद्धा घाटनांदूरच्या घटनेनंतर हा प्रकार घडला असून या ठिकाणीसुद्धा अज्ञात जमावाने धुडगूस घातला आहे. या दोन्ही घटनांची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. या घटनेमुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 8 / 11 शरद पवार गटाचे माधव जाधव यांना बेदम मारहाण: परळी येथील बैंक कॉलनीतील मतदान केंद्राबाहेर थांबलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अॅड. माधव जाधव यांना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेले बाबा शिंदे यांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. परळीतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सकाळी शहरातील काही मतदान केंद्रांवर भेट दिली. त्यानंतर येथील बैंक कॉलनीतील मतदान केंद्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख गेले असता, त्यांच्यासोबत असलेले अॅड, माधव जाधव, राजेश देशमुख, बाबासाहेब शिंदे, सुदामती गुट्टे हे मतदान केंद्राच्या बाहेर थांबलेले होते, अगोदर बाबा शिंदे यांना एकाने गालावर चापट मारली. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर थांबलेल्या माधव जाधव यांना चापटा बुक्क्यांनी विरोधी चार-पाच जणांनी मारहाण केली. यानंतर माधव जाधव तिथून निघून गेले. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. जाधव हे घाटनांदुरचे आहेत. त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत राहून प्रचार केला होता. बुधवारी उमेदवारासोबत मतदान केंद्राला भेट देत असताना त्यांना मारहाण झाली. 9 / 11 ईव्हीएम फोडण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला - 'परळी मतदारसंघात जे दादागिरी व दहशतीची भाषा करीत आहेत, ते तुतारीचे उमेदवार व त्यांच्या मुलाने घाटनांदूर येथील मतदान यंत्राची तोडफोड केली आहे. तसेच मुरंबी, चोथेवाडी, तळेगाव घाट, सेलू आंबा येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच घाटनांदूरमध्ये मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सी सिरसाट यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आजपर्यंत तीस वर्षांत मतदान यंत्राची तोडफोड करण्याचा प्रकार आपण कधीही पाहिला नाही. पहिल्यांदाच मतदान यंत्राची विरोधी उमेदवारांच्या जवळच्या माणसांनी तोडफोड करून निवडणुकीला गालबोट लावले आहे. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आपण प्रशासनास कळविले आहे,' अशी माहिती परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी दिली. 10 / 11 मतदानाचा टक्का ३ ने वाढला जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाचा टक्का ३.८ ने वाढला आहे. रात्री १० वाजता निवडणूक विभागाने सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची अंदाजित आकडेवारी दिली. यामध्ये ६७.३४ ६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. सर्वाधिक मतदान हे परळी मतदारसंघात झाले असून, सर्वात कमी बीड मतदारसंघात झाले आहे. 11 / 11 कुठे उशिरापर्यंत रांगा, तर कुठे कर्मचारी परतले- जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट, पाटोदा व धारुर शहरातील काही मतदान केंद्र तसेच गेवराई तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. दुसरीकडे सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करुन काही अधिकारी व कर्मचारी मतपेट्या घेऊन परतले होते. अनेक ठिकाणी शांततेत प्रक्रिया पार पडल्याबद्दल स्वागत केले. आणखी वाचा