शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'भाऊबंध'की ते भाऊबंदकी... असे बिघडत गेले भाजपा आणि शिवसेनेतील संबंध!

By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2019 4:01 PM

1 / 11
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती आता जवळपास मोडली आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संबंध जरी आज विकोपाला गेले असले तरी त्याची सुरुवात अनेत वर्षांपूर्वी झाली होती. आज आपण जाणून घेऊया भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महायुतीमधील 'भाऊबंध'की ते भाऊबंदकीपर्यंतच्या प्रवासाविषयी.
2 / 11
1990 च्या दशकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेना भाजपा युतीचा पाया घातला होता. त्यानंतर 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या झंझावाती प्रचारामुळे राज्यात काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर राज्यात शिवसेना भाजपाचं सरकार स्थापन झालं होतं.
3 / 11
पुढे केंद्रातही भाजपाची सत्ता आली. त्यावेळी रालोआमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेलाही दिल्लीत मानाचे पान मिळाले. 1999 मध्ये युतीचे राज्यातील सरकार गेले. त्यानंतर2004 मध्ये केंद्रातही रालोआचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाला दीर्घकाळ विरोधात बसावे लागले.
4 / 11
2009 च्या निवडणुकीपर्यंत युतीमध्ये सारे काही आलबेल होते. मात्र बाळासाहेबांचे निधन आणि भाजपात नरेंद्र मोदींचं वर्चस्व वाढू लागल्यानंतर हळुहळू दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण होऊ लागले. सुरुवातीच्या काळा मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला शिवसेनेकडून समर्थन मिळत नव्हते. उलट सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवाणी यांची बाजू शिवसेनेकडून उचलून धरली जात होती. ही बाब कुठे ना कुठे मोदींना खटकत होती. त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि शिवसेनेतील दरी वाढली.
5 / 11
2014 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातही आपण स्वबळावर सरकार स्थापन करू शकतो ही भावना भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ झाली. त्यातून जागावाटपातील मतभेदांचे कारण पुढे करत भाजपाने युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला
6 / 11
युती तुटल्यानंतर शिवसेनेने भाजपा आणि मोदी-शहांवर घणाघाती टीका केली. त्यामुळे दोन्ही पक्षांत कमालीची कटुता आली. मात्र निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. तर शिवसेना विरोधी पक्षात बसली. मात्र काही काळाने शिवसेना दुय्यम खाती घेऊन सरकारमध्ये सहभागी झाली.
7 / 11
त्यानंतर मात्र शिवसेना आणि भाजपामधील संबंध बिघडलेलेच राहिले. शिवसेना भाजपावर टीका करत राहिली. तर भाजपाकडून शिवसेनेला दुय्यम लेखण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा कार्यक्रम सुरू राहिला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे युतीत सडल्याचे सांगत यापुढे स्वळावर लढण्याची घोषणाही केली. मात्र त्यांनी प्रत्यक्ष काही युती तोडली नाही.
8 / 11
नोटाबंदी, जीएसटी, राम मंदिर अशा मुद्यांवरून शिवसेनेने भाजपावर वारंवार टीका केली. राजीनामे देण्याच्या धमक्याही दिल्या. सत्तेपासून काही शिवसेना दूर झाली नाही.
9 / 11
या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली होती. मात्र तीन राज्यांतील पराभवामुळे धक्का बसलेल्या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेशी युती करण्यासाठी मवाळ भूमिका घेतली. भाजपाध्यक्ष अमित शहांनी मातोश्रीवर धाव घेत तडजोडी केल्या. त्यातून समसमान सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला. लोकसभा निवडणुकीत या महायुतीला दणदणीत यशही मिळाले.
10 / 11
मात्र लोकसभा निवडणुकीत बंपर यश मिळाल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्वबळाची चाचपणी सुरू केली. अखेर हो नाही हो नाही करत निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षात युतीवर एकमत झाले होते. मात्र दोन्ही पक्ष एकदिलाने लढलेच नाहीत. त्यामुळे अबकी बार 220 पारचा नारा देणारी महायुती 160 वरच अडली.
11 / 11
राज्यात स्वबळावर स्वप्न पाहणारा भाजपा बहुमतापासून फार दूर राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने आपल्या मित्रपक्षाला सत्तेतील समसमान वाटपाच्या शब्दाची आठवण करून दिली. मात्र भाजपाने आपण असा शब्द दिलाच नसल्याची भूमिका घेतली. त्यातून महायुतीचे मतभेद विकोपाला गेले आणि अखेरीस राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहा