शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 12:58 PM

1 / 10
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.
2 / 10
सूत्रांनुसार, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागावाटपावर एकमत झालंय. कोण किती जागा लढवणार हेदेखील फायनल झाल्याचं कळते. काही जागांवर अद्याप चर्चा आहे परंतु लवकरच त्यावरही तोडगा काढला जाईल असं सांगण्यात येत आहे.
3 / 10
महायुतीत भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे. भाजपा सर्वाधिक जागा लढवेल. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर असेल. भाजपा १५०-१५५, शिवसेना ९०-९५ तर राष्ट्रवादी ४०-४५ जागा लढवू शकते. अजित पवारांकडून आणखी १० जागांसाठी मागणी होत आहे.
4 / 10
जागावाटपाला अंतिम रुप देण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुती निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित करण्याची शक्यता आहे. बहुतांश जागांचा तिढा सुटलेला आहे. अद्याप २५ जागांवरील तिढा सोडवणं बाकी आहे.
5 / 10
महायुतीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने अनेक सर्व्हे केलेत. कुणालाही उमेदवारी देण्यापूर्वी विजयाची क्षमता तपासली जाईल त्यालाच उमेदवारी देण्याचा निर्णय होईल. सध्याच्या आमदारांमध्ये केवळ ५ ते १० टक्के उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते.
6 / 10
२०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना एकच होती, अजित पवारही काका शरद पवारांसोबत होते. मात्र मागील ५ वर्षात राज्यातील राजकीय गणित बिघडलं आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत यंदाच्या निवडणुकीत दिसेल.
7 / 10
अडीच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेचे बहुतांश आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर अजित पवारांनीही शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत आले.
8 / 10
माहितीनुसार, राज्यातील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, त्यात महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यातील अशा नेत्यांचाही समावेश केला जाणार आहे जे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले किंवा त्यांना निवडणुकीचं तिकिट मिळालं नव्हते.
9 / 10
लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. त्यामुळे महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.
10 / 10
लोकसभा निकालात भाजपाने सर्वाधिक २८ जागा लढवल्या मात्र त्यातील केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त १ जागा जिंकता आली. विधानसभेला महायुतीसमोर सरकार टिकवणं मोठं आव्हान बनलं आहे.
टॅग्स :Mahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे